पुणे शहर

बाळासाहेब ठाकरे आम्हा दोघांना उद्देशून “जय भवानी जय शिवाजी” म्हणायचे माजी आमदार दीपक पायगुडे यांची भावनिक पोस्ट

राजकारणातील सिंघम गेला म्हणत माजी आमदार विनायक निम्हण यांच्या निधनानंतर पायगुडे यांनी व्यक्त केल्या भावना

पुणे :  माजी आमदार विनायक निम्हण यांचे काल हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. राजकारणातील सिंघम गेला म्हणत माजी आमदार व मनसे नेते दीपक पायगुडे यांनी सोशल मीडिया वर भावनिक पोस्ट शेअर करित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पायगुडे  म्हणतात, माझे अत्यंत जवळचे मित्र, वडीलबंधू माजी आमदार विनायकशेठ निम्हण यांच्या निधनाची बातमी ऐकून मन अगदी सुन्न झालं; अजूनही यावर विश्वास बसत नाही. त्यांचं असं जाणं सर्वांनाच व्यथित करणारं आहे. शिवसेनेत असताना मी भवानीपेठ विधानसभा मतदारसंघाचा तर विनायकशेठ हे शिवाजीनगर मतदारसंघांचे आमदार होते.

शिवसेनेच्या ‘जय भवानी जय शिवाजी…!’ या घोषणेशी जवळीक साधणारे असे हे आमचे मतदारसंघ असल्यानं वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आम्हां दोघांना उद्देशून मतदार संघाच्या नावावरूनच माझा जय भवानी आणि विनायकशेठ यांचा जय शिवाजी… असं संबोधित असत. शिवसेनाप्रमुखांच्या या उल्लेखानं शेठ खूप खुश होत असत.

Fb img 1647413711531

त्यांची एकूण कार्यशैली पाहता, त्यांना राजकारणातले खऱ्या अर्थानं ‘सिंघम’ म्हणता येईल असेच ते होते. कोणत्याही Action ला तात्काळ Reaction हा त्यांचा मुळ स्वभाव होता. त्यांची राजकारणातली एन्ट्री आणि पावलापावलावर त्यांच्यात होत गेलेला सकारात्मक बदल हा पाषाणातून जशी मूर्ती घडवली जाते ना, अगदी तसंच त्यांनी स्वतःची राजकीय कारकिर्द स्वतः घडविली होती. एकदा एखाद्याला शब्द दिला की मग तो शब्द पूर्ण करण्यासाठी मग ते स्वतःचं देखील ऐकायचं नाहीत; त्याचा काहीही परिणाम होवो, मागे फिरणं त्यांना ठाऊकच नव्हतं. एकदोन नाही तर अशी शेकडो उदाहरणं आहेत. हाच विनायकशेठ यांचा प्लस पॉईंट होता.

त्यामुळं सध्या सक्रिय राजकारणातून थोडंसं बाजूला असतानाही त्यांचा मोठा मित्रपरिवार सर्व पक्षात आणि संस्थामध्ये होता. त्यांच्याशी ते सतत संपर्कात असायचे. आमदार असताना आमचं मुंबईला एकत्र जाणं असो किंवा नागपूरच्या विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर हल्दीराम मधून मतदार संघातले शिवसैनिक, मित्रपरिवारासाठी संत्राबर्फीची हजारो रुपयांची खरेदी असो. ते मनापासून करायचे. त्यांना दुसऱ्यांना भरवणं खूप आवडायचे. त्यांचं वागणं हे ‘शेठ’सारखं असायचं; म्हणूनच त्यांना सारे ‘शेठ’ असंच संबोधित असत. कारण ते ‘स्वभावाचेही शेठ’ होते. अत्यंत मनमोकळ्या स्वभावाचे शेठ हे आपला मित्र परिवार हाच आपला कुटुंबकबिला आहे असं ते म्हणत! कुटुंबातले सदस्य, नातेवाईक, शिवसैनिक आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते यात त्यांनी कधीच अंतर राखलं नव्हतं. माझ्या अडचणीच्या काळात विनायकशेठकडून येणारे फोनवरील शब्द हे आधार वाटायचे, त्या अडचणीतून पार पडण्यासाठी सहाय्यभूत ठरायचे.

Img 20221012 192956 045

काही महिन्यांपूर्वीच आमच्या एका कॉमन मित्राच्या मुलाच्या लग्नानिमित्तानं गोव्याला गेलो असताना आमच्या भरभरून गप्पा झाल्या. सुखदुःखाचे क्षण आम्ही एकत्रच अनुभवले. अशा माझ्या स्वभावाने शेठ असणाऱ्या मित्राला श्रद्धांजली वाहणं खूप जड जातंय; पण नियती पुढं कुणाचंच काही चालत नाही! दिवाळीच्या शुभेच्छा देतानाच त्यांना श्रद्धांजली वाहावी लागतेय हे मोठं क्लेशकारल आहे. माझ्या या ‘सिंघम’ मित्राला, ‘पाषाणा’तल्या ‘विनायक’मूर्तीला माझं विनम्र अभिवादन….!भावपूर्ण श्रद्धांजली….!!! अशा शब्दात दीपक पायगुडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये