छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर?
मुंबई : ओबीसींच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देऊ नका त्यांना वेगळं आरक्षण द्या, अशी थेट भूमिका राष्ट्रवादीचे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी घेतली आहे. त्यानंतर आता अंजली दमानिया यांच्या एका पोस्टमुळे छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि संजय शिरसाट या दोन्ही नेत्यांनी मंत्रिमंडळातून छगन भुजबळ यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली होती. यानंतर छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अंजली दमानिया यांनी याबाबत पोस्ट केली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये अंजली दमानिया म्हणतात, “भुजबळ भाजपाच्या वाटेवर?, एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप” अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे. त्यामुळे छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर आहेत का? अशा चर्चेला उधाण आले आहे.
छगन भुजबळ यांनी त्यांच्या राजकीय आयुष्याची सुरुवात ही शिवसेना या पक्षापासून केली होती. शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख होती. शिवसेनेला सोडचिठ्ठी देणारे ते पहिले बंडखोर होते. बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख होती. १९९१ मध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये त्यांनी शरद पवारांसह जात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर सध्या ते अजित पवार गटात आहेत. २ जुलै २०२३ या दिवशी त्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली होती. सध्या छगन भुजबळ राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आहेत. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्थापना छगन भुजबळ यांनी १ नोव्हेंबर १९९२ रोजी केली होती. आता राष्ट्रवादी सोडून छगन भुजबळ भाजपत जाणार का? हा प्रश्न चर्चेत आहे.