एकनाथ शिंदेंची सुरक्षा काढून घेतल्याचा दावा तथ्यहीन : शरद पवार

पुणे : “आधीच झेड सुरक्षाव्यवस्था असलेल्या एकनाथ शिंदेंना गडचिरोलीचे पालकमंत्री या नात्याने अधिक सुरक्षा होती. त्यामुळे शिंदे यांची सुरक्षा काढून घेतल्याचा दावा तथ्यहीन आहे.”, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
गडचिरोलीचे पालकमंत्री असतानाही एकनाथ शिंदे यांची सुरक्षाव्यवस्था तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी काढून घेतली होती, असा आरोप शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी केला होता. त्यासंदर्भात विचारले असता शरद पवार यांनी हे भाष्य केले. पवार म्हणाले, “मला वस्तुस्थिती माहित नाही. पण, शासनात अनेक वर्ष काम केल्याने मला हे माहिती की सुरक्षा पुरवण्याचा निर्णय मंत्रीमंडळ घेत नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याची चर्चा होत नाही. मुख्य सचिव, गृह सचिव आणि पोलीस महासंचालक यांच्या समितीमध्ये त्याचा निर्णय होतो. एकनाथ शिंदे यांना झेड दर्जाची सुरक्षाव्यवस्था होती आणि गडचिरोलीचे पालकमंत्री असल्याने त्यांना अधिक सुरक्षा होती. माजी गृहमंत्र्यांनी हे सांगितले आहे. त्यामुळे अधिक काही बोलायची गरज नाही.”
राज्यातील सत्ताबदलासाठी मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे लागले, या भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानासंदर्भात विचारले असता “त्यांनी दगड मनावर ठेवावा की डोक्यावर हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याविषयी मला काही बोलायचे नाही.” तर, नारायण राणेंना संपविण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले, असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. त्यासंदर्भात विचारले असता “पोराबाळांच्या मुद्द्यावर मी बोलणं योग्य नाही”, अशी टिप्पणी पवार यांनी केली.