क्लीनबोल्ड कोणाचा? हे आज सर्वांना कळाले : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : शिवसेना भाजप विकासाच्या बोटीत आज दादा आले. गुगली, क्लीन बोल्ड आता संपलं. नेमका कोणाचा “क्लीन बोल्ड” झाला हे संपूर्ण देशाने पाहिले, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या राजकीय घडामोडींवर मत व्यक्त केले.

शिवसेना भाजप सरकारच्या विकासावर विश्वास ठेवणारे अजित पवार यांनी साथ देण्यासाठी आज आमच्या सोबत आले. त्यांचे आणि त्यांच्या आमदारांचे शिवसेना भाजप सरकारमध्ये स्वागत करतो. प्रशासनाचा दादांना चांगला अनुभव आहे. दादांचा विकासावर विश्वास, महाविकास आघाडीचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना अनुभव आहे. आमच्या वर्षभराच्या कामाची नोंद घेऊन त्यांनी विकासाला साथ दिली. कार्यकर्त्याची गळचेपी, चांगल्या नेत्याला दुय्यम स्थान त्यामुळे दादांनी आमच्या सोबत येण्याचा निर्णय घेतलेला आहे. दादांसोबत राष्ट्रवादीचे मोठ्या प्रमाणावर आमदार, खासदार व पदाधिकारी आलेले आहेत. याचा फायदा राज्याच्या विकासासाठी नक्कीच होईल. आता महाराष्ट्राचे डबल इंजिन सरकार आणखी वेगाने वाटचाल करणार, बुलेट ट्रेनच्या वेगाने आता राज्याचा विकास होईल. महाविकास आघाडी फुटायची राहिली आहे का? देशाची मोट बांधायला निघाल्यांचीच मोट फुटली, असा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीची खिल्ली उडवली.



मोदींच्या विरोधात देशातील सर्व राजकीय विरोधी पक्ष एकत्र मात्र पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण हे ठरत नाही. सर्व विरोधकांनी एकत्र येणं हेच मोदींचे यश आहे. आजच्या सरकारमधील दादांच्या सहभागाने महाविकास आघाडीची मोट फुटली. शिवसेना भाजप विकासाच्या बोटीत आज दादा आले. गुगली, क्लीन बोल्ड आता संपलं. नेमका कोणाचा “क्लीन बोल्ड” झाला हे संपूर्ण देशाने पाहिले. दादा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना शुभेच्छा असा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तेत सहभागी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.



