उद्योग

उद्योगांची ऑक्सिजन पाठोपाठ वीजकोंडी,
शिवणे इंडस्ट्रियल परिसरातील उद्योजक त्रस्त

पुणे : कोरोना (कोविड १९) चा प्रसार रोखण्यासाठी पुकारलेला लॉकडाऊन टाळेबंदी आणि उद्योगांचा ऑक्सिजन काढून घेण्याच्या निर्णयानंतर वारंवार खंडित  होणारा विद्युत पुरवठा उद्योजकांच्या अडचणीत भर पाडत आहे.  त्यामुळे, दर सप्ताहाला कामाचे हजारो तास वाया जात असल्याची तक्रार शिवणे इंडस्ट्रियल इस्टेट येथील उद्योजक करीत आहेत.  त्याच प्रमाणे, तातडीने सक्षम आणि अखंडित वीजपुरवठा देण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे.

मार्च मधील लॉकडाउन जून मध्ये रिलीझ करण्यात आला.  त्यातून सावरत असताना राज्य सरकारने उद्योगांसाठी केवळ वीस टक्के आणि रुग्णालयांसाठी तब्बल ८० टक्के ऑक्सिजन देण्याचा निर्णय घेतला.  तसेच, आवश्यकतेनुसार उर्वरित २० टक्के ऑक्सिजन देखील रुग्णांसाठी वापरण्याचे ठरविण्यात आले.  ही अडचण कमी म्हणून शिवणे येथील इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे.  त्या मुळे उद्योगांचे काम ठप्प पडत असल्याची तक्रार उद्योजकांकडून करण्यात येत आहे. 

शिवणे औद्योगिक परिसरात विद्युतपुरवठा खंडित होण्याचा प्रकार वारंवार घडत आहे. शिवणे परिसरात  २०० ते २५० कंपन्या असून, आसपासच्या क्षेत्रामध्येही मोठ्या प्रमाणावर लघुउद्योग आहेत. औद्योगिक परिसरातील अनेक फिडर आणि कंडक्टर हे जुने झाल्याने उद्योगांसह रहिवासी परिसरामध्ये  देखील वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याचे शिवणे इंडस्ट्रियल असोसिएशनचे चेअरमन संजय भोर यांनी सांगितले. 

शिवणे इंडस्ट्रियल इस्टेट मधील उद्योजक उदय रायकर म्हणाले, उद्योगनगरीतील वीज यंत्रणा अत्यंत जीर्ण झाली असून ती अपुरी पडत आहे.  परिसरामध्ये अतिरिक्त रोहित्र उभारण्याची गरज आहे.  त्याच बरोबर वीज यंत्रणेत बिघाड झाल्यास तातडीने दुरुस्त झाला पाहिजे.  दोन दिवसांपूर्वी पंधरा मिनटात बिघाड दुरुस्तीचे आश्वासन देऊन हि , तक्रार करूनही,  वेळेत दुरुस्ती होत नाही.   

सक्षम वीजपुरवठ्यासाठी महावितरणने अतिरिक्त फिडर आणि कंडक्टर बसवावेत, अशी मागणी यापूर्वी करण्यात आलेली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.  औद्योगिक परिसराच्या तुलनेत महावितरणने  पुरेशी कर्मचारी संख्या दिलेली नाही.  त्यामुळे कामाचा निपटारा होत नाही.  त्याचा फटका औद्योगिक  परिसराला बसतो.  विजेचा लपंडाव पाहायला मिळत असल्याने उद्योजक हैराण झाले आहेत. अशीच समस्या कायम राहिल्यास येथील उद्योजक आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे भोर यांनी सांगितले.   

Tags
Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये
Close
Close