कोथरूडमध्ये तरुणाईचा जल्लोष ; दहीहंडी फोडतानाचा थरार अनुभवण्यासाठी जनसागर रस्त्यावर

कोथरूड : डी जे च्या तालावर थिरकणारी तरुणाई, बोल बजरंग बली की जय, गोविंदा आला रे आलाचा जयघोष आणि गोविंदा पथके थरावर थर लावत असताना होणार जल्लोष, त्याबरोबरच वरुण राजाने लावलेली हजेरी अशा उत्साहपूर्ण आणि जल्लोषपूर्ण वातावरणात कोथरूड मधील दहीहंड्या फोडण्यात आल्या. दहीहंडी फोडतानाचा थरार अनुभवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती.
श्री तुळजाभवानी माता, राधाकृष्ण संस्था, समस्त गावकरी मंडळ कोथरूड दहीहंडी

कोथरूड मधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारक चौकात श्री तुळजाभवानी माता, राधाकृष्ण संस्था समस्त गावकरी मंडळ कोथरूडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवात तरुणाईचा उत्साह पहिला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, गोविंदा आला रे आला रे ने परिसर दणाणून गेला होता. ठाण्याच्या मराठा गोविंदा पथकाने दहीहंडी फोडली आणि एकच जल्लोष झाला. यावेळी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, माजी नगरसेवक योगेश मोकाटे, कोथरूड मधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवशाही प्रतिष्ठानचा दहीकाला



कोथरुड एकलव्य कॉलेज डीपी रस्त्यावरील शिवशाही प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अंजली गोरडे व आयोजक राजाभाऊ गोरडे यांच्या वतीने करण्यात आलेल्या दहीकाला उत्सवाला मोठ्या प्रमाणात कोथरूड मधील नागरिकांनी हजेरी लावली. दहीकाल्याचा कौटुंबिक सोहळा या ठिकाणी पाहिला मिळाला. चेंबूरच्या सहयोग गोविंदा पथकाने सात थरांची सलामी देत हजारो गोपाळ भक्त व नागरिकांच्या उपस्थितीत हंडी फोडली. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील ,सौरभ गाडगीळ ,प्रविण बढेकर व जगदीश राव यावेळी उपस्थित होते.
ओम चॅरिटेबल ट्रस्टची महिला दहीहंडी



पुणे शहरातील एकमेव महिला दहीहंडी म्हणून प्रसिद्ध असलेली कोथरूडमधील ओम चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित महिला दहीहंडी मुंबई चेंबूरच्या अमरज्योत सेवा मित्र मंडळाच्या गोपिका पथकाने फोडली. त्यांना ट्रस्ट च्या वतीने ११११११/- चे पारितोषिक देण्यात आले. कोथरूड मधील महिलांची मोठ्या संख्येने या दहीहंडीला उपस्थिती होती. रिमिक्स गाण्यांवर महिला वर्गाने मनसोक्त डान्स करत जल्लोषात दहीहंडीचा आनंद लुटला. माजी नगरसेवक ॲड किशोर शिंदे यांच्या वतीने या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. संजय काळे, गणेश शिंदे, रवी वाल्हेकर, श्रीकांत अमराळे, शशांक अमराळे, धनंजय बलकवडे, विकास जाधव, विराज डाकवे, साधू धुमाळ, प्रतिक कंधारे, आकाश बोबडे, यांच्या सह सचिन फ्रेंड्स सर्कल कुंदन ग्रुप व संगम तरुण मंडळ ट्रस्ट यांनी संयोजन केले होते.
संयुक्त आझादनगर मित्र मंडळ



संयुक्त आझादनगर मित्र मंडळाची दहीहंडी आळंदीच्या शिवशाही पथकाने फोडली. यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आप्पी आमची कलेक्टर या मराठी मालिकेतील अभिनेत्री नीलम वाडेकर, मिस्टर इंडिया किरण साठे, कर्नल विपुल पाटील व परिसरातील सर्व मंडळाचे अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते. माजी नगरसेविका वासंती जाधव व नवनाथ जाधव यांच्या वतीने या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने महिलावर्ग, परिसरातील नागरिक यांनी यावेळी उपस्थित राहत दहीहंडीचा थरार अनुभवला.
कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठानची दहीहंडी



कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठानची दहीहंडी पारंपरिक वाद्यांच्या गजरात उत्साहपूर्ण वातावरणात फोडण्यात आली. यावेळी एकदंत वाद्य पथकाचे वादन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल भेलके यांच्या वतीने या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
अखिल आझादनगर दहीहंडी उत्सव समिती



शिवगर्जना प्रतिष्ठान आयोजित अखिल आझाद नगर दहीहंडी उत्सव समितीचे दहीहंडी गोवंडीच्या जय हनुमान पथकाने फोडली. या वर्षी शिवगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने दहीहंडी रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे या दहीहंडीचे रिल आपल्या मोबाईलमध्ये बनवून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तरुण तरुणींकडून गर्दी करण्यात आली होती. जय हनुमान पथक मुंबई गोवंडी यावेळी पुण्याचे पालकमंत्री कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील उपस्थित राहत गोपाळ भक्तांना शुभेच्छा दिल्या. अमित तोरडमल यांनी या दहीहंडीचे आयोजन केले होते. दहीहंडी फोडणाऱ्या जय हनुमान पथकाला कोथरूड पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक तानाजी पांढरे व प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.





