बालेकिल्ला कोथरूडमध्ये मोठे शक्ती प्रदर्शन करीत मुरलीधर मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल
पुणे : पुण्यातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या कोथरूड मधून मोठे शक्ती प्रदर्शन करित रॅली काढत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कोथरुडमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून कर्वे रस्त्याने डेक्कन परिसरातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकापर्यंत मोहोळ यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी रॅली काढली होती.
या रॅलीसाठी तयार करण्यात आलेल्या रथामध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, आमदार माधुरी मिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, किरण साळी सहभागी झाले होते.
मोहोळ यांच्या या रॅलीचे ठिकठिकाणी जेसीबीवरील मोठमोठे हार आणि त्यावरून उधळण्यात येणारी फुले याच्या माध्यमातून स्वागत करण्यात येत होते. सकाळी साडेदहा च्या सुमारास या रॅलीला कोथरुडमधून सुरुवात झाली. भाजपा आणि महायुतीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्यने रॅलीमध्ये उपस्थित होते. साडेदहा वाजता कोथरुडमधून निघालेली रॅली सुमारे साडेबाराच्या सुमारास नळस्टॉप चौकात आली होती.
विविध चौकांमध्ये रॅलीचे होणारे स्वागत आणि कार्यकर्त्यांची मोठी संख्या यामुळे संथगतीने सुरुवातीला रॅली पुढे सरकत होती. ठिकठिकाणी फुले उधळून आणि फटाके फोडून मोहळ आणि महायुतीतील नेत्यांचे स्वागत होत होते.