कोथरूडमध्ये एका तासात ८० हजार रुपये दंड वसूल
कोथरुड : कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीने आज मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर व रस्त्यावर थुंकणाऱ्या थुंक सम्राटांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मास्क न वापरणारे १४८ व सार्वजनिक ठिकाणी थुंकून कोरोनाला आमंत्रण देणाऱ्या ६ अशा एकूण १५४ नागरिकांवर कारवाई करत एका तासात ८०, हजार रूपये दंड वसूल करण्यात आला.
महाराष्ट्र राज्यात विशेषतः पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात कोविड १९ चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक ठिकाणी थुंकून अस्वच्छता करणाऱ्या व मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. सदर कारवाईचे आदेश विभागीय आयुक्तामार्फत देण्यात आले आहेत. महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी व पोलीस यंत्रणेला कारवाई करण्याचे अधिकार दिले आहेत.
त्यानुसार आज कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाच्या अंतर्गत प्रभाग क्रमांक १०,११,१२ अंतर्गत महापालिका आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन यांच्या वतीने डहाणूकर काॅलनी भुयारी मार्ग, कै. मोहनराव शिराळकर चौक,शास्त्री नगर पोलीस स्टेशन चौक, किनारा हॉटेल चौक, कर्वे पुतळा चौक, छत्रपती शिवाजी पुतळा चौक, पौड फाटा चौक, भेलके नगर चौक येथे कारवाई करण्यात आली. दुचाकी स्वारांवर व चार चाकी वाहने थांबवून मास्क न वापरणाऱ्या प्रत्येक नागरिकांकडून ५०० रुपये व थुंकी सम्राटांकडून १ हजार रुपये प्रमाणे दंड वसूल करण्यात आला. दंडात्मक कारवाई करत असताना खिशात पैसे नसणाऱ्या कांही थुंकी बहाद्दरांना बैठका काढण्याच्या शिक्षाही देण्यात आल्या.
सदर कारवाई कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त संदीप कदम, पोलीस निरिक्षक प्रतिभा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे व पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरिक्षक सचिन लोहकरे, गणेश साठे, प्रमोद चव्हाण, पोलीस हवालदार ए. आर. अंधारे, श्रावण शेवाळे, गणेश कंधारे, मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे, लक्ष्मण सोनवणे या भरारी पथकाने केली.