निवडणूक आयुक्तपदी टी.एन. शेषन यांची नियुक्ती झाल्यावर त्यांनी निवडणूक आचारसंहितेचे पालन व्हावे याकरिता कठोर पावले उचलली, त्याला जनतेतून प्रतिसाद मिळाला आणि भारतीय निवडणुकीचा चेहरामोहरा बदलला. त्यापूर्वी म्हणजे १९९० पूर्वी निवडणूक म्हणजे शहरभर फलक, विविध पक्षांचे झेंडे, घोषणांनी रंगविलेल्या भिंती, दिवसभर कर्णकर्कश आवाजात फिरणाऱ्या प्रचारी रिक्षा, रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या सभा, मिरवणुका असे स्वरूप होते. अशामध्ये महापालिका निवडणुका म्हणजे धमाल असायची.
काँग्रेसचे निवडणूक चिन्ह गाय वासरू आणि जनसंघाची पणती ७०-७५ सालापर्यंत प्रसिद्ध होती.जनता पक्षाचा नांगरधारी शेतकरी हे चिन्ह गाजले. महापालिकेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची गर्दी व्हायची, त्यांना निवडणूक चिन्हे मजेशीर मिळायची आणि चिन्ह लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी युक्त्या शोधल्या जायच्या. घोडा चिन्ह मिळालेला उमेदवार खेळण्यातले घोडे आणून घरोघर वाटायचा. लोकसभा निवडणुकीत एका उमेदवाराला बादली चिन्ह मिळाले होते. त्या उमेदवाराने काठीला उंच बादली बांधली आणि ती बादलीची काठी स्कूटरवर बांधून तो उमेदवार फिरायचा, बादलीवाले असे नांवच त्या उमेदवाराला पडले.
गुलाबाचे फूल, बॅट अशी चिन्हे असायची. फूल चिन्हावर चार ओळीच्या कविता रचून … के हाथमें गुलाबका फूल, असे लिहीलेले असायचे. मंडई परिसरात एका उमेदवाराला ८५ साली सिंह चिन्ह मिळाले होते. मतदानाच्या दोन दिवस अगोदर त्या उमेदवाराने खरोखरचा सिंह प्रचारात आणला.एका पिंजऱ्यात सिंह होता, तो पिंजरा वॉर्डातून फिरवला. अक्कलकोटहून तो सिंह आणला असे सांगितले गेले. मंडईचा परिसर, गर्दी त्या सिंहाला सगळेच नवे होते. रागावलेला, संतापलेला सिंह जोरात डरकाळ्या फोडायचा. गर्दीला अधिक चेव चढायचा. साऱ्या पुण्यात तो सिंहाचा प्रचार गाजला होता. सिंह पाह्यला गर्दी झाली पण उमेदवाराला मते काही मिळाली नाहीत. तरीही आपला प्रचार कसा गाजला ? याचा आनंद उमेदवाराच्या समर्थकांना होता.
राजेंद्र पंढरपुरे
(जेष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक)
4 Comments