अभ्यासक्रमात मनुस्मृती नको त्यापेक्षा महात्मा फुलेंची शिकवण मुलांना द्या : छगन भुजबळ
मुंबई : मनुस्मृती ही शाळांमध्ये शिकवू देणार नाही, असा इशारा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सरकारला दिला आहे. ते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते.
महाराष्ट्र ज्या महापुरुषांनी घडवला त्या महापुरुषांची शिकवण लहान मुलांना देणे गरजेचे आहे.
जे कां रंजले गांजले । त्यासी ह्मणे जो आपुले ॥
तोचि साधू ओळखावा । देव तेथेचि जाणावा ॥
असा उपदेश देणार तुकाराम महाराज असतील किंवा अवघे विश्वची माझे घर असे शिकविणारे संत ज्ञानेश्वर महाराज असतील. ‘धर्म, राज्य, भेद हे मानवा नसावे, सत्याने वर्तावे इशासाठी’ असे शिकवण देणारे महात्मा फुले असतील किंवा “पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे”! असं ठणकावून सांगणारे अण्णाभाऊ साठे यांची शिकवण मुलांना दिली गेली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
छगन भुजबळ म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये 400 पार हा नारा दिल्यानंतर देशांमध्ये संविधान बदलले जाणार असा प्रचार विरोधकांनी केला आणि त्यामुळेच अनेक ठिकाणी दलित वर्ग नाराज झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. ही चर्चा कुठे शांत होत नाही तर लगेच मनुस्मृतीच्या चर्चा सुरू व्हायला लागल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात याचा देखील फटका आपल्याला बसु शकतो याचा विचार आपण करायला हवा.
भुजबळ पुढे म्हणाले की, नुकत्याच राज्यात लोकसभा निवडणुका होऊन गेल्या आता आगामी काळात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आचारसंहिता लागेल या काळामध्ये सर्व आमदारांच्या मतदारसंघातील कामे खोळंबता कामा नये