क्रीडा

पुण्यात महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धेला आजपासून सुरूवात : क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेचा होणार शोध

पुणे : पुणे येथे नव्या वर्षाच्या सुरूवातीस २ ते १२ जानेवारी दरम्यान श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धा होत आहेत. तब्बल २३ वर्षांनंतर शासनाच्या पुढाकाराने या स्पर्धांचे आयोजन होत असल्याने या स्पर्धांना विशेष महत्त्व आहे. ३९ क्रीडा प्रकारात राज्यातील पुरुष व महिलांचे सर्वोत्तम ८ संघ यात सहभागी होणार असल्याने त्यांचा खेळ पाहण्याची संधी जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींना मिळणार आहे. मल्लखांब, सॉफ्टबॉल, योगासन, रोलर स्केटिंग, सॉफ्ट टेनिस, गोल्फ आणि विशेष बाब म्हणून शूटिंगबॉल अशा सात नव्या क्रीडा प्रकारांचा समावेश महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत करण्यात आला आहे.

महाराष्ट्र क्रीडा क्षेत्रात देशातील महत्त्वाचे राज्य आहे. गेल्या ५ वर्षात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने चांगल्या कामगिरीत सातत्य ठेवत नेत्रदीपक यश मिळविले आहे. १९९४ मध्ये बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडानगरीत राष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनप्रसंगी भारतरत्न लता मंगेशकर यांचे ‘कदम कदम पे नक्श है, विजय हमारा लक्ष है..’ हे स्वर जणू राज्याच्या क्रीडा क्षेत्राची वाटचाल दर्शविणारे होते. त्याच क्रीडा नगरीने अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविले. ती परंपरा पुढे नेण्याच्यादृष्टीने महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धा महत्त्वाची आहे.

Img 20221126 wa02126927299965323449855

खो-खो, कबड्डी, कुस्ती सारख्या देशी खेळात आपला पूर्वीपासून दबदबा आहे. मात्र शासनाने क्रीडा सुविधांचा विकास आणि प्रशिक्षणावर विशेष लक्ष दिल्याने इतर खेळातही आपले खेळाडू आंतररराष्ट्रीय पातळीवर यश संपादन करताना दिसत आहेत. राज्याच्या क्रीडा विकासाला चालना देण्यासाठी तसेच खेळ व खेळाडूंना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी २००१ मध्ये राज्याचे क्रीडा धोरण आखण्यात आले. असे धोरण आखणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले.

राज्याच्या क्रीडा लौकीकात भर घालण्यासाठी आणि या क्षेत्रातील आपली कामगिरी उंचावण्यासाठी क्रीडा विभागामार्फत ‘ऑलिम्पिक व्हिजन’ तयार करण्यात आले आहे. राज्याच्या प्रत्येक भागात उत्तम क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंना प्रशिक्षण आणि आर्थिक साहाय्य केले जात आहे. त्यासोबतच शालेय आणि स्थानिक स्पर्धांनाही आवश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत. महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धेसाठीदेखील शासनाने १९ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

नुकतेच बालेवाडी येथे खेलो इंडिया स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. त्यानंतरची ही दुसरी मोठी स्पर्धा असेल. अशा स्पर्धांच्या माध्यमातून राज्यात क्रीडा संस्कृती रुजविण्यासोबत क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेचा शोध घेता येतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळविण्याची क्षमता असलेले गुणवंत खेळाडू अशा स्पर्धांमधून पुढे येतात. त्यांना आपला खेळ दाखविण्याची संधी मिळावी आणि त्यासोबत नव्या दमाच्या खेळाडूंना प्रेरणा मिळावी यासाठी अशा स्पर्धांना महत्त्व आहे.

बालेवाडी-म्हाळुंगे येथील १५३ एकराच्या परिसरात उभारण्यात आलेली श्री शिवछत्रपती क्रीडानगरी हे देशाचे क्रीडावैभव आहे. सर्व प्रकारचे ऑलिम्पिक खेळ असणारे हे देशातील पहिले क्रीडासंकुल आहे. इथल्या अत्याधुनिक सुविधा लक्षात घेता या क्रीडानगरीत येऊन खेळ दाखविण्याचे स्वप्न राज्यातील प्रत्येक खेळाडूच्या मनात असते. राज्यभरातील ३ हजार ८५७ पुरुष व ३ हजार ५८७ महिला खेळाडू असे एकूण ७ हजार ४४४ खेळाडूंना या स्पर्धेच्या निमित्ताने ही संधी मिळणार आहे. स्पर्धेत खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, व्यवस्थापक, पंच, स्वयंसेवक, तांत्रिक अधिकारी यांच्यासह एकूण १० हजार ४५६ जणांचा सहभाग असणार आहे.

क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेची तयारी करण्यात आली आहे. खेळाडूंना उत्तम सुविधा मिळाव्यात असा क्रीडा विभागाचा प्रयत्न आहे. ऑलिम्पिक असोसिएशनदेखील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

मिनी ऑलिम्पिक म्हणून ओळखली जाणारी ही स्पर्धा देशाच्या क्रीडा क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. खेळाडूंना उत्तम संधी आणि योग्य मैदान मिळाले तर त्यांच्यातील प्रतिभा उंचावते, अशी संधी देणारी ही स्पर्धा आहे. यातून पुढे येणारे खेळाडू देशाचे नेतृत्व करतील आणि येणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्येदेखील यश मिळवतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

राज्यातील आठ विभागीय मुख्यालयातून क्रीडा ज्योत स्पर्धास्थळी आणली जाणार असल्याने राज्यभरात क्रीडा संस्कृतीला पोषक वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे. मुख्य क्रीडा ज्योत रायगडावर प्रज्वलित करण्यात येऊन ५ जानेवारीला मिरवणूकीने ती क्रीडानगरीत येणार आहे. क्रीडा क्षेत्रातही करिअर करण्याची संधी आहे, प्रतिष्ठा आहे हा संदेश यानिमित्ताने शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत जावा आणि त्यांच्या क्रीडा कौशल्याला चालना मिळावी हाच यामागचा उद्देश आहे.

स्पर्धांची ठिकाणे

१. पुणे- ॲथलेटिक्स, फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, ज्युदो, लॉन टेनिस, मॉडर्न पँन्टाथलॉन, शुटींग, रग्बी, जलतरण-वॉटरपोलो, टेबल टेनिस, तायक्वांदो, ट्रायथलॉन, वेटलिफ्टिंग, कुस्ती, वुशू, सायकलींग, स्क्वॅश, बॉक्सिंग, व्हॉलीबॉल, रोलर स्केटींग, गोल्फ, सॉफ्ट टेनिस

२. नागपूर- बॅडमिंटन, नेटबॉल, हॅण्डबॉल, सेपक टकरा
३. जळगांव – खो-खो, सॉफ्टबॉल, मल्लखांब, शुटींगबॉल
४. नाशिक- रोईंग, योगासन
५. मुंबई- याटींग, बास्केटबॉल
६. बारामती- कबड्डी
७. अमरावती- आर्चरी,
८. औरंगाबाद- तलवारबाजी
९. सांगली- कनाईंग-कयाकिंग
अशा ठिकाणी खेळाच्या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धा आयोजनासाठी आवश्यक तयारी करण्यात आली आहे.

-जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये