ओबीसींची फसवणूक, दिवसाढवळ्या गरीब जमातीचं आरक्षण लुटलं : प्रकाश शेंडगे
![ओबीसींची फसवणूक, दिवसाढवळ्या गरीब जमातीचं आरक्षण लुटलं : प्रकाश शेंडगे Fb img 1706365256781](https://www.sinhasannews.com/wp-content/uploads/2024/01/FB_IMG_1706365256781.jpg)
मुंबई : ओबीसी समाजाची सर्वात मोठी फसवणूक झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या सर्वच नेत्यांनी आम्हाला शब्द दिला होता की, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, परंतु, आता तीन कोटी समाज कुणबी दाखल्यांसह ओबीसीत येणार असेल तर हा धक्का नाही का? आज दिवसाढवळ्या गरीब जमातीचं आरक्षण लुटलं गेलं, अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिली आहे.
शेंडगे म्हणाले, या सर्व गोष्टींमुळे खरंच मराठा समाजाचा फायदा होणार आहे की तोटा होणार हे कालांतराने लोकांच्या लक्षात येईल. कारण ओबीसी आरक्षणाचं रोहिणी आयोगानुसार वर्गीकरण होणार आहे. संपूर्ण मराठा समाज कुणबी म्हणून ओबीसीत आला तर त्यांना नऊ टक्क्यांच्या गटात टाकलं जाईल. त्या नऊ टक्क्यांपैकी मराठा समाजाला केवळ दोन टक्के आरक्षण मिळेल. संपूर्ण समाज कुणबी दाखले घेऊन ओबीसीत आला तर मराठा या जातीचं अस्तित्व संपुष्टात येईल.
प्रकाश शेंडगे पुढे म्हणाले, वरवर असं दिसतंय की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं आहे. मराठा समाजातील लोकांना कुणबी दाखले द्यायचं नक्की झालं आहे. मनोज जरांगेंच्या मागणीनुसार सगेसोयऱ्यांना आणि गणगोतांनाही आरक्षण देऊन १०० टक्के समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसीत घालण्याचा सरकारचा आणि मनोज जरांगे यांचा प्रयत्न यशस्वी झाला आहे असं दिसतंय. परंतु, थोड्याच दिवसांत दूथ का दूध आणि पाणी का पाणी होईल.
ओबीसी आरक्षण लुटलं जात असताना सर्वजण केवळ बघ्याच्या भूमिकेत आहेत. या सरकारने अक्षरशः ओबीसी आरक्षणाचे तीन-तेरा वाजवले आहेत. आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे या सरकारचा निषेध करावा तितका कमी आहे.