वारजे माळवाडीकर विठूनामाच्या गजरात भक्ती रसात तल्लीन..

वारजे : सध्या वारजेकर विठूनामाच्या गजरात भक्ती रसात तल्लीन होत आहेत. रोज होत आलेल्या प्रसिद्ध प्रवचनकार व कीर्तनकरांच्या प्रवचन व कीर्तनांनी व सकाळची काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, गाथाभजन, व रात्री महाप्रसाद यामुळे वारजे माळवाडीचे वातावरण भक्तिमय झाले आहे.
राजयोग प्रतिष्ठान, श्रीमंत राजयोग गणेश मित्र मंडळ वार्षिक श्री गणेश उत्सव सोहळा यांच्या माध्यमातून आणि श्री गणेश मंदिराच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीं च्या भव्य पालखी मिरवणूक सोहळ्याने या सप्ताहाची सुरुवात झाली. वारकरी संप्रदायाला, परंपरेला मानणारा मोठा वर्ग वारजे माळवाडी, शिवणे उत्तमनगर परिसरात आहे. शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदीप ऊर्फ बाबा धुमाळ व विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांचा परिवार ही वारकरी संप्रदायाला मानणारा आहे आणि म्हणूनच दरवर्षी या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन त्यांच्या वतीने करण्यात येत असते.
४ मे पासून सुरू असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये आतापर्यंत ह.भ.प. विलास महाराज रकटे, गुलाब महाराज सूर्यवंशी, ज्ञानेश्वर महाराज पाटील, कृष्णा महाराज माने यांची प्रवचने तर ह.भ.प सुप्रियाताई साठे ठाकूर, शंकर महाराज शेवाळे, संगीताताई चोपडे येनपुरे, नरेंद्र महाराज गुरव यांची कीर्तने पार पडली आहेत.
८ मे ते १० मे दरम्यान ह.भ.प शाहूमहाराज कांबळे, पांडुरंग महाराज हिंगे, भक्तीताई हांडे कुटे यांची प्रवचने तर ह.भ.प महंत राधाताई सानप, सागर महाराज बोराटे, शालिनीताई निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तने होणार आहेत. बुधवार दिनांक ११ मे रोजी सकाळी दहा ते बारा ह.भ.प उमेश महाराज किर्दत (सातारा) यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. या सप्ताहाचे संयोजन राज योग प्रतिष्ठान, राजयोग महिला मंडळ, श्रीमंत राजयोग गणेश मित्र मंडळ, राजयोग भजनी मंडळ, सम्राट मित्र मंडळ यांनी केले आहे.






















