कुणाची बायको आत्महत्या करणार होती, तर कुणाला राणे संपवणार होते म्हणून मंत्रीपद; भरत गोगावले यांचा मोठा गौप्यस्फोट
रायगड : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं. त्यानंतर त्यांनी भाजपशी हातमिळवणी करून सत्ताही स्थापन केली. शिंदे स्वत: मुख्यमंत्री झाले. त्यांच्यासोबत शिवसेनेतून 40 आमदार आले होते. तर 10 अपक्षही त्यांच्यासोबत आले होते. एकूण 50 आमदारांनी शिंदे यांना साथ दिली. यातील अनेकजण मंत्रीपदावर पाणी सोडून आले होते. त्यामुळे या सर्वांना नव्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा होतीच. शिवाय मलाईदार खातं मिळण्याची इच्छा होती. राज्यमंत्र्यांना कॅबिनेटचा दर्जा मिळण्याची इच्छा होती. त्यामुळे मंत्रीपद देणं शिंदे यांच्यासाठी मोठं आव्हान होतं. हे आव्हान शिंदे यांनी कसं पेललं? मंत्रिपद देण्यामागचा निकष नेमका काय होता, याचा मजेदार किस्साच शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी सांगितला.
भरत गोगावले एका सभेत बोलत होते. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना गोगावले यांनी अनेक आतल्या गोष्टी सांगितल्या. शिंदे सरकारमध्ये आमदारांची नाराजी कशी होती? मंत्रीपद मिळवण्यासाठी आमदारांनी कशा कशा क्लृप्त्या वापरल्या, शिंदे यांना कसं ब्लॅकमेल केलं याचा भांडाफोडच केला. मंत्रीपद मागणाऱ्यांची संख्या वाढल्याने शिंदे अडचणीत आले होते. त्यामुळे मंत्रीपदाच्या स्पर्धेतून आपल्या स्वत:लाही माघार घ्यावी लागल्याचं गोगावले यांना आपल्या खास शैलीत स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री अडचणीत सापडलेले दिसले आम्हाला. आम्ही म्हटलं ठिक आहे. काय झालं विचारलं. एक बोलतो बायको आत्महत्या करेल. एक बोलतो मला नारायण राणे संपवेल. एक बोलतो राजीनामा देईल. साडेपाचला एकाला फोन केला. विचारलं काय रे? संभाजीनगरमध्ये तुम्हाला पाचपैकी दोघांना मंत्रीपदं दिली. आम्ही तीनपैकी एकही घेत नाही. आम्ही थांबतो. तुला एवढी घाई कशाला? त्याला समजावला.
आता बायकोवाल्याचं काय करायचं? साहेबांना बोललो आता त्याच्या बायकोला आपल्याला जगवायला पाहिजे. मग त्याला मंत्रीपद दिलं. दुसऱ्याला नारायण राणे संपवायला नाही पाहिजे. आपला एक आमदार कमी होईल. बोललो त्यालाही देऊन टाका. मी थांबतो तुमच्यासाठी आणि मी थांबलो तो आजपर्यंत थांबलो, असं भरत गोगावले म्हणाले.
दरम्यान, गोगावले यांनी हे मजेदार किस्से ऐकवले असले तरी गोगावले यांचा रोख कुणाकडे आहे? असा सवाल या निमित्ताने व्यक्त केला जात आहे. कोणत्या आमदाराची बायको आत्महत्या करणार होती म्हणून त्याला मंत्रीपद देण्यात आलं? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. तर नारायण राणेंची भीती असलेला कोकणातील तो मंत्री कोण? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.