‘मतदान कार्ड विकणे आहे’ आजच्या राजकीय घडामोडीनंतर अनेकांची व्हॉट्सॲप स्टेटस

पुणे : आज राज्याच्या राजकारणात भूकंप घडून आला आणि अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकार मध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. गेल्या काही वर्षात सत्तेसाठी झालेल्या राजकीय घडामोडी पाहता लोकांना या प्रकारचा विट आल्याचे दिसत आहे. आज झालेल्या प्रकारानंतर अनेक जणांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘मतदान कार्ड विकणे आहे’ असे स्टेटस ठेवून आपला रोष व्यक्त केला आहे.
अशा काही घटना घडल्या की नेटिझन्स आपली मते व्यक्त करत असतात. त्यांना पटलं की ते त्या बाजूने बोलतात नाही पटलं तर विरोधात बोलतात. आजच्या राजकीय घडामोडीनंतर नेटिझन्सने आपला राग व्यक्त केला आहे.
राजकीय पक्ष मतदारांना गृहीत धरत आहे का काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचा पहाटेचा शपथ विधी, महाविकास आघाडीचा शपथ विधी, एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस शपथ विधी आणि आज झालेला अजित पवारांचा शपथ विधी असे चार वर्षात घडलेला प्रकार पाहता जे चाललय ते योग्य नसल्याची भावना नागरिकांच्या चर्चेतून पुढे आली आहे. त्यामुळेच आजचा राजकीय प्रकार घडल्यानंतर मतदान कार्ड विकणे आहे अशी स्टेटस लोकांनी टाकले आहेत.







