पुणे शहरमहाराष्ट्र

कर्वेनगर- सिंहगड रस्ता पुलासाठीच्या भुसंपादनाला मुहूर्त कधी ?

कोथरूड उपनगरातून सिंहगड रस्ता परिसराला जोडणाऱ्या कर्वेनगर ते सनसिटी दरम्यान नवीन पूल पुणे महापालिकेचकडून निर्माण करण्यात येणार आहे. पुलाचा आराखडा निश्चित झाला असून  अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. मात्र पालिकेकडून भुसंपादनाचेच काम पूर्ण झाले नसल्याने या पुलाचे काम रखडले आहे.

या पुलासाठी पालिकेकडून सुरुवातीला एक कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. मात्र पालिकेकडून अद्यापही जागा ताब्यात घेण्यात आल्या नसल्याने या पुलाच्या कामाचा दोन वर्षे उलटूनहि शुभारंभ करण्यात आला नाही. याबाबतीत स्थानिक नगरसेवक राजेश बराटे आक्रमक झाले असून त्यांनी तातडीने काम सुरु करा. अन्यथा आंदोलन करण्यात येइल. असा इशारा पालिकेला दिला आहे.

कर्वेनगर येथील दुधाणे लॉन्स ते सिंहगड रस्त्यावरील सन ऑर्बिट सोसायटी जवळील डीपी रस्ता या अंतरामध्ये मुठा नदीवर हा पूल विकसित करण्यात येणार आहे.  या पुलाची लांबी ३८० मीटर असून रूंदी ३० मीटर असणार आहे. या पुलावरील रस्ता ४ लेनचा असून यासाठी ३० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या पुलासाठी प्रयत्न केले आहेत.

‎कर्वेनगर ते सनसिटी दरम्यान होणाऱ्या नवीन पुलाला कर्वेनगरमधील दुधाणे लॉन्सजवळ शिवणे – खराडी या नदी पात्रालगतच्या रस्त्याला जोडण्यात येणार असल्याने सिंहगड रस्त्यावरून या पुला मार्गे शहरातील विविध भागामध्ये पोहचणे अधिक सोयीचे होणार आहे.

‎कोथरूड उपनगरातून सिंहगड रस्त्याला जोडणारे रवींद्र म्हात्रे पुल आणि छत्रपती राजाराम महाराज पूल हे दोन पुल यापूर्वी बांधण्यात आले आहेत. मात्र सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर,माणिकबाग सनसिटी भागातून विनाविलंब वाहतूक कर्वेनगर ,वारजे आणि कोथरूड उपनगरामध्ये पोहचण्यासाठी या पुलाचा वापर करण्यात येणार आहे.

दैनंदिन कामाच्या निमित्ताने ‎कोथरूड उपनगरातून सिंहगड रस्ता भागात ये- जा करणाऱ्या नागरिकांना या पुलामुळे मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.

‎……………..

नगरसेवक राजेश बराटे म्हणाले, पश्चिम उपनगरातील वाहतूकीसाठी हा पुल अत्यंत गरजेचा आहे. महापौर आणि तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष मोहोळ यांनी या पुलासाठी निधी दिला. मात्र पालिकेकडून दोन वर्षे उलटली तरी देखील जागा ताब्यात घेण्याचे काम झाले नाही. वारंवार पाठपुरावा करूनही कार्यवाही होत नाही. पालिकेने काम सुरु केले नाही. तर पालिका प्रशासनाविरोधात आंदोलन करणार आहे.

‎……………….

‎महापालिकेचे वाहतूक सल्लागार आणि उपायुक्त श्रीनिवास बोनाला म्हणाले, पुलाच्या आराखड्यानुसार अपेक्षित जागा ताब्यात आल्या नसल्याने हे काम थांबले आहे. जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. या कामासाठी सुरुवातीला एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

‎……………….

‎नागरिकांच्या प्रतिक्रिया

‎किशोर बडवे ( नागरिक)  कर्वेनगर,वारजे आणि सनसिटी,माणिकबाग हा परिसर जोडण्यासाठी या पुलाचा दोन्ही परिसरातील नागरिकांसाठी मोठा उपयोग होणार आहे. पुलाचे काम कमी वेळेत पूर्ण व्हायला हवे.

‎सुनील काळे ( नागरिक) या पुलाचा निश्चितपणे चांगला वापर होईल. मला कामानिमित्त वारजे भागातून सिंहगड रस्ता भागात जावे लागते. सध्या राजाराम पुलावरून किंवा बाह्यवळण महामार्गावरून सिंहगड रस्ता परिसरात जावे लागते.

निलेश बेलसरे (नागरिक) दोन्ही उपनगरांना जोडणारा हा नविन पुल नागरिकांना वरदान ठरेल. सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळून या पुलाद्वारे सनसिटी परिसरात पोहचणे शक्य होणार आहे.मात्र पुलाचे काम निश्चित कालावधीत पूर्ण झाले पाहिजे.

‎……………………….

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये