कोथरूडमधील या भागातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी नवीन पाण्याच्या टाकीच्या कामाचे झाले भूमिपूजन

२० लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात येणार
कोथरूड : कोथरूड येथील स्वामी विवेकानंदनगर, हिल व्हिव, वुड्स रॉयल, शांभवी, वंडर फ्युचुरा तसेच वेदभवन मंदिर परिसरातील नागरिकांसाठी उभारण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या कामाचे भूमिपूजन आमदार भिमराव तापकीर यांच्या हस्ते करण्यात आले.
वरील भागातील पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी आमदार भिमराव तापकीर व माजी नगरसेविका अल्पना गणेश वरपे यांच्याकडून प्रयत्न सुरू होते. अखेरीस या ठिकाणी २० लाख लिटर क्षमतेच्या पिण्याच्या पाण्याची टाकी उभारण्यात येणार असून त्या कामाचे भूमिपूजन आज झाले.

या प्रसंगी पुणे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप, ॲड. गणेश वरपे माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील, माजी नगरसेविका श्रद्धा प्रभुणे व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अल्पना वरपे यांनी प्रास्ताविक केले. तसेच केवळ टाकीचे बांधकाम पूर्ण न करता टाकी पूर्ण झाल्यानंतर लगेचच त्यामधून नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करा अशा सूचना आमदार भिमराव तापकीर यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केली.
कोथरूड येथील स्वामी विवेकानंदनगर, हिल व्हिव, वुड्स रॉयल, शांभवी, वंडर फ्युचुरा तसेच वेदभवन मंदिर परिसरातील नागरिकांना अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे पाणी समस्येला सामोरे जावे लागत होते. या भागातील नागरिकांचा कायमचा पाणी प्रश्न मिटावा यासाठी माजी नगरसेविका अल्पना वरपे यांच्याकडून महापालिकेत पाठपुरावा सुरू होता. आमदार भीमराव तापकीर यांच्याकडूनही अधिकाऱ्यांशी बोलणे सुरू होते. अखेरीस या प्रयत्नांना यश आले असून आता पाण्याच्या टाकीच्या कामाचा शुभारंभ झाला आहे.
वर्षभरात पाण्याच्या टाकीचे काम करून त्यानंतर जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले की पाणीपुरवठा सुरू केला जाईल असे पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी यावेळी सांगितले. उल्हास कपूर यांनी स्वागत तर गजेंद्र सुतार यांनी सूत्रसंचालन केले.


