‘निर्भय विद्यार्थी अभियान’ राज्यासाठी पथदर्शी : राहुल मोरे

पुणे : शहराच्या पूर्व भागात राबविण्यात येत असलेले ‘निर्भय विद्यार्थी अभियान’ हे स्वयंसेवी संस्था, पोलीस, स्थानिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, शाळा आणि पालक यांच्या समन्वयातून सुरू असलेले लोकसहभागाचे आदर्श उदाहरण आहे. विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण, व्यसनविरोधी विचार, लैंगिक शिक्षण आणि सामाजिक जाणीवांचे मार्गदर्शन करून त्यांना गुन्हेगारी व व्यसनांपासून दूर ठेवण्याचा हा विधायक उपक्रम राज्यासाठी पथदर्शी ठरू शकतो, असे मत राज्य महिला व बाल विकास विभागाचे उपायुक्त राहुल मोरे यांनी व्यक्त केले.

पुणे शहर पोलीस आणि निर्भय विद्यार्थी अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी व पोलीस अधिकारी यांच्यासाठी ‘प्रशिक्षकांचे प्रशिक्षण’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रांतवाडी येथील परिवर्तन आरोग्य भवन येथे झालेल्या या कार्यशाळेत ४० स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच परिमंडळ चार व सातमधील विविध पोलीस ठाण्यांतील ३६ पोलीस अधिकारी सहभागी झाले होते.
कार्यशाळेचे उद्घाटन अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. कैलास बाविस्कर, पोलीस उपायुक्त रजनीकांत चिलुमुला तसेच अभियानाचे संस्थापक सदस्य ॲड. दिलीप कुऱ्हाडे, निखिल गायकवाड, विजय शिवले, पौर्णिमा गादिया आणि सुलभा क्षीरसागर उपस्थित होते.
दोन दिवसीय कार्यशाळेत विविध तज्ज्ञांनी महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले. ॲड. दिलीप कुऱ्हाडे यांनी कुमारवयीन मुलांच्या समस्या, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे समुपदेशक मंगेश कार्लेकर यांनी व्यसनविरोधी विचार, ॲड. असुंता पारधे यांनी कौटुंबिक हिंसाचाराचे मुलांवरील परिणाम, तर रेश्मा कचरे यांनी मानसिक आरोग्य व ताणतणाव व्यवस्थापन याविषयी माहिती दिली. दुसऱ्या दिवशी डॉ. राणी खेडेकर यांनी लैंगिक शिक्षण, सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुरी पवार यांनी पॉक्सो कायदा, अलका पावनगडकर व राजश्री दामले यांनी मूल्यशिक्षण, तर सांख्यिकी अधिकारी नारायण गायके यांनी महिला व बालविकास विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली.



या प्रशिक्षणातून तयार होणारे प्रशिक्षक आगामी काळात शाळा व स्थानिक स्तरावर जनजागृती आणि प्रबोधनाचे कार्यक्रम राबविणार असून विद्यार्थ्यांना व्यसन आणि गुन्हेगारीपासून दूर ठेवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.



