पुणे शहर

मेट्रो कामाचा ताण येणार डीपी रस्त्यावर ;     शांतीबन चौक ते भुसारी कॉलनी रस्ता ३६ मीटरचा करावा…

नगरसेविका अल्पना वरपे यांनी घेतली आयुक्तांची भेट

पुणे : कोथरूड परिसरातील वाढती वाहतूक कोंडी आणि आगामी मेट्रो तसेच उड्डाणपूल प्रकल्पांचा विचार करता शांतीबन चौक गणेश मंदिर ते डावी भुसारी कॉलनीमार्गे हायवे सर्व्हिस रोडपर्यंतचा रस्ता ३६ मीटर रुंद करण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका तथा महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा अल्पना वरपे यांनी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.

Img 20251125 wa01783213374507166536090

अलीकडेच शांतीबन चौक ते डावी भुसारी कॉलनी (हायवे सर्व्हिस रोडपर्यंत) जाणारा डीपी रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र हा रस्ता सुरू झाल्यापासून स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना दररोज मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सध्या या रस्त्याची रुंदी केवळ १५ मीटर असून परिसरातील वाढती लोकसंख्या, नव्या गृहनिर्माण प्रकल्पांची वाढ आणि वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता ही रुंदी अपुरी ठरत आहे.

सदर डीपी रस्त्यालगत असलेल्या काही गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्विकासाचे नियोजन आगामी काळात होणार आहे. त्यामुळे पुनर्विकास प्रक्रियेदरम्यान रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न प्रभावीपणे सोडविण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचे अल्पना वरपे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. पुनर्विकास प्रकल्पांना परवानगी देताना रस्ता ३६ मीटर रुंद करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करता येऊ शकते. त्यामुळे भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेऊन पुनर्विकास आणि रस्ता रुंदीकरण यांचे समन्वित नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

यासंदर्भात त्यांनी प्रशासनाचे लक्ष आगामी काळातील महत्त्वाच्या विकासकामांकडे वेधले आहे. पौड रस्त्यावर वनाज ते चांदणी चौक या दरम्यान मेट्रो प्रकल्पाचे काम तसेच उड्डाणपूल उभारणीची कामे लवकरच सुरू होणार आहेत. या कामांदरम्यान मुख्य रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर पर्यायी मार्गांकडे वळवली जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सद्यस्थितीतील शांतीबन चौक,  एकलव्य पासून पुढे हायवे सर्व्हिस रस्त्यापर्यंत असणारा १५ मीटर रुंदीचा रस्ता वाहतुकीचा वाढीव ताण सहन करू शकणार नाही, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.

सध्या रस्ता सुरू झाल्यानंतरच अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून नागरिकांना प्रवासासाठी अधिक वेळ खर्च करावा लागत आहे. भविष्यात मेट्रो आणि उड्डाणपूलाच्या कामामुळे या समस्येची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दीर्घकालीन वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने या रस्त्याचे रुंदीकरण करणे आवश्यक असल्याचे वरपे यांनी म्हटले आहे.

यासाठी शांतीबन चौक गणेश मंदिर ते डावी भुसारी कॉलनी येथील हायवे सर्व्हिस रोडपर्यंतचा संपूर्ण डीपी रस्ता ३६ मीटर रुंद करण्याचा प्रस्ताव तातडीने मंजूर करून आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी अल्पना वरपे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी दूर करण्यासाठी तसेच भविष्यातील वाहतुकीच्या गरजा लक्षात घेऊन प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने पाहून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये