बालेवाडी-वाकड जोडरस्ता आणि म्हाळुंगे टी.पी. स्कीमबाबत अमोल बालवडकरांची महापालिका आयुक्तांची भेट

पुणे : पुणे शहरातील महत्त्वाची आणि दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली विकासकामे मार्गी लावून त्यांना गती मिळावी, या उद्देशाने नगरसेवक अमोल बालवडकर यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांची आज भेट घेऊन विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या भेटीदरम्यान प्रामुख्याने बालेवाडी-वाकड जोडरस्ता आणि म्हाळुंगे टी.पी. स्कीम या दोन महत्त्वाच्या विषयांवर विशेष लक्ष वेधण्यात आले.
अमोल बालवडकर म्हणाले, बालेवाडी-वाकड जोडरस्त्याचे काम पूर्णत्वास जाण्यासाठी आवश्यक असलेली उर्वरित भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी आणि प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी, अशी आग्रही मागणी आयुक्तांकडे करण्यात आली. या जोडरस्त्यामुळे परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

तसेच म्हाळुंगे टी.पी. स्कीमच्या अंमलबजावणीतील प्रशासकीय अडथळे दूर करून पुढील आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, जेणेकरून या महत्त्वपूर्ण विकास योजनेला गती मिळेल, अशी मागणीही करण्यात आली.याशिवाय पुणे शहरातील विविध विकासकामांची सद्यस्थिती, प्रलंबित प्रश्न आणि त्यावरील उपाययोजनांबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली.
पुण्याचा विकास केवळ घोषणांमधून नव्हे, तर प्रत्यक्ष कामातून दिसला पाहिजे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेले रस्ते, पायाभूत सुविधा आणि नियोजनबद्ध विकासाचे प्रश्न वेळेत मार्गी लागणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून प्रलंबित कामे प्रत्यक्षात पूर्णत्वास नेण्यासाठी आपला प्रयत्न सुरू राहील. अशी माहिती अमोल बालवडकर यांनी दिली.









