महापालिका शाळांच्या खाजगीकरणाला ठाम विरोध; विद्यार्थ्यांच्या हितासाठी नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांची स्पष्ट भूमिका

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील इंग्रजी माध्यमाच्या ५ शाळांसाठी आकांक्षा फाउंडेशनला प्रति विद्यार्थी प्रति वर्ष ₹२५,००० दराने मान्यता देणे, कार्यादेश देणे, करारनामा करणे व बिल अदा करण्याबाबत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांनी ठाम विरोध नोंदविला.
नगरसेवक हर्षवर्धन मानकर म्हणाले, महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे याबाबत कोणतेही दुमत नाही. मात्र गेल्या सात-आठ वर्षांपासून महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षक भरती झालेली नाही. अनेक शाळांमध्ये गरजेपेक्षा शिक्षकांची संख्या कमी असून विविध मूलभूत सुविधांचाही अभाव आहे. अशा परिस्थितीत शाळांमधील पटसंख्या का घटत आहे, याचे आत्मपरीक्षण करून आवश्यक शिक्षक भरती व पायाभूत सुविधांवर भर देणे अपेक्षित आहे.

त्याऐवजी महापालिकेच्या शाळांचे संचालन एका संस्थेकडे सोपवून त्यासाठी महापालिकेच्या निधीतून मोठ्या प्रमाणात खर्च करण्याचा प्रस्ताव पुढे आणला जात आहे. सार्वजनिक निधीचा वापर करताना पारदर्शकता, उत्तरदायित्व, परिणामकारकता आणि आर्थिक न्याय्यता यांचा सखोल विचार होणे आवश्यक आहे.
महापालिका शाळांच्या खाजगीकरणाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या या भूमिकेला आमचा ठाम विरोध आहे. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शाळा सक्षम करणे, शिक्षकांची भरती करणे आणि विद्यार्थ्यांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देणे हा अधिक शाश्वत मार्ग आहे. विद्यार्थी, पालक आणि करदात्यांचे हित सर्वोच्च ठेवून या प्रस्तावावर फेरविचार करण्याची मागणी मानकर यांनी केली.



