शाश्वत सुखाची प्राप्ती करायची असेल तर संतानी दिलेल्या मार्गाचं अनुकरण करावं ; ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील

बावधन : ज्या साधकाला शाश्वत सुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे त्याने कोणाच्या मागे जाण्यापेक्षा साधुसंतांनी दिलेल्या शिकवणीचे त्यांनी दाखवलेल्या मार्गाचे अनुकरण करावे, तसे केल्यास त्याच्या आयुष्याचं निश्चितच कल्याण होईल. असे विचार संत निळोबाराय यांच्या अभंगाचा दाखला देत ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी व्यक्त केले.
गेली सहा दिवस बावधन आणि परिसराचे वातावरण भक्तिमय झालेले आहे. सुरू असलेल्या भव्य कीर्तन महोत्सवामुळे वैष्णवांची मांदियाळी बावधन मध्ये भरली असल्याचे चित्र पाहिला मिळत आहे. वडील स्वर्गीय ज्ञानोबा बाबुराव दगडे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त बापूसाहेब दगडे पाटील भव्यदिव्य अशा कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले असून आतापर्यंत नामवंत कीर्तनकारांनी या महोत्सवात कीर्तन सेवा करत समाज प्रबोधनाचे काम केले. सहाव्या दिवशी ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे कीर्तन पार पडले. यावेळी संपूर्ण सभामंडप विठ्ठल भक्तांनी भरून गेला होता. ते म्हणाले, अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे की, सध्या बावधान गावात काय सुरू आहे. वडिलांच्या स्मरणार्थ आयोजित या कीर्तन महोत्सवाचे नियोजन मुलगा बापूसाहेब दगडे पाटील यांनी एवढे जीव ओतून केले असल्याने एक सुंदर सोहळा सर्वांना अनुभवता येत आहे. एवढ्या सुंदर नियोजनामुळे मेघराज ही रोज हजेरी लावत आहे.

ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी कीर्तनासाठी संत तुकोबांचे कृपापात्र शिष्य असलेले संत निळोबाराय यांच्या खालील अभंगाची निवड केली होती.
मार्ग दाउनी गेले आधीं । दयानिधी संत पुढें ॥१॥
तेणेंचि पंथें चालोंजातां । न पडे गुंता कोठें कांहीं ॥२॥
मोडूनियां नाना मतें । देती सिध्दांते सौरसु ॥३॥
निळा म्हणे ऐसे संत । कृपावंत सुखसिंधु ॥४॥
ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील म्हणतात संत निळोबाराय यांनी सांगितल्याप्रमाणे साधने त्याला सुखाची प्राप्ती आणि न अटणारा आनंद मिळवायचा असेल तर संतानी दिलेल्या मार्गाचं अनुकरण त्यानं करावं.



जो आया है वो जायेगा या संत कबीरांच्या दोह्याचा दाखला देत पुरुषोत्तम महाराज पाटील म्हणतात जो आला आहे त्याला जावं लागणार आहे. जाण हे तुमच्या हातात आहे ना माझ्या, कधी जाणार हे कोणाला माहित नाही ? पण कसं जायचं हे तुमच्या, माझ्या हातात आहे. थोडंच जीवन जग पण अस जगा की, तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नावाचा सुगंध सर्वत्र दरवळला पाहिजे.
गेले दिगंबर ईश्वर विभूति । राहिल्या त्या कीर्ति जगामाजी ॥ १ ॥



महाराष्ट्राच्या मातीत माणसाला स्थिर करण्याची कोणती जागा राहिली असेल तर ती फक्त ही नारदाची गादी आहे. समाजातील जातिवाद मत्सर संपवायचा असेल तर ते हे व्यासपीठ आहे. प्रत्येकालाच साधू संन्यासी बनण्याची गरज नाही अंतकरणात फक्त भगवंत पाहिजे.
ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील म्हणाले सावकारानं, एखाद्या पुढाऱ्यानं आपल्या मुलीच्या लग्नात जेवढा खर्च करावा तसा खर्च करून बापूसाहेब दगडे पाटील यांनी पारमार्थिक सेवेसाठी हा कीर्तन सोहळा वडिलांच्या आठवणीत घेतला. गेली पाच दिवस या सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्यांनी ज्ञानगंगेत अंघोळ केली आहे.