पुणे–पंढरपूर सायकल वारी उत्साहात; २३५० जणांचा सहभाग

इंडो अथलेटिक्स सोसायटीची १० वी पुणे–पंढरपूर सायकल वारी; भारतातील सर्वात मोठ्या सायकल वारीचा मान
पुणे : संपूर्ण भारतातील क्रीडा व आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या इंडो अथलेटिक्स सोसायटीतर्फे आयोजित करण्यात आलेली दहावी पुणे–पंढरपूर सायकल वारी शनिवारी (२० जून) मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. देहू येथील गाथा मंदिरातून पहाटे प्रस्थान केलेल्या या वारीत तब्बल २३५० सायकलस्वारांनी सहभाग नोंदवत २३५ किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला.

यंदाचे वर्ष सायकल वारीच्या दहाव्या पर्वाचे असल्याने सहभागींचा उत्साह विशेष पाहायला मिळाला. मागील सर्व वर्षांतील विक्रम मोडत यंदा देशभरातून आलेल्या सायकलप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. पीसीएमसीचे बापूसाहेब गायकवाड, एमआयडीसीचे अधिकारी प्रकाश शेटबाळे, उद्योजक अन्नारे बिरादार, तात्यासाहेब शेवाळे, बैद्यनाथ हॉस्पिटल संभाजीनगरचे डॉ. संदीप सानप व अनिल सानप तसेच महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक श्रीराम पानझाडे यांच्यासह आय ए एस चे गजानन खैरे, अजित पाटील, गणेश भुजबळ व इतर अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
इंडो अथलेटिक्स सोसायटीचे वारी प्रमुख गिरीराज उमरीकर यांनी सांगितले की, “वारीचे हे दहावे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व सहभागी सायकलस्वारांनी एका दिवसात देहू ते पंढरपूर हा प्रवास पूर्ण केला. विशेष म्हणजे यंदा सुमारे ३०० महिला आणि १०० हून अधिक बालसायकलस्वारांनी सहभाग घेतला. महाराष्ट्राबाहेरील राज्यांतूनही मोठ्या प्रमाणावर सायकलस्वार या उपक्रमात सहभागी झाले.”



सायकल वारीची प्रेरणादायी वाटचाल
भारतात सायकल वारीची परंपरा रुजविण्याच्या उद्देशाने इंडो अथलेटिक्स सोसायटीने २०१६ मध्ये अवघ्या ७ जणांसह या उपक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर २०१७ मध्ये २४, २०१८ मध्ये १६०, २०१९ मध्ये सुमारे ५०० सहभागी झाले. कोविड काळातही हा उपक्रम खंडित झाला नाही. २०२१ मध्ये १७५ जणांनी पुणे–पंढरपूर अंतर पूर्ण केले. त्यानंतर २०२२ मध्ये १२००, २०२३ मध्ये १५००, २०२४ मध्ये १७५०, २०२५ मध्ये १९५० आणि यंदा २३५० हून अधिक सायकलस्वार सहभागी झाले. त्यामुळे भारतातील सर्वात मोठी सायकल वारी म्हणून या उपक्रमाने नवा इतिहास रचल्याची माहिती संस्थापक सदस्य गजानन खैरे यांनी दिली. तसेच प्रमुख सदस्य अजित पाटील व गणेश भुजबळ यांनी वारी मार्ग आणि नियोजनाविषयी सविस्तर माहिती दिली.
सायकल वारी मार्ग
देहू – निगडी – नाशिक फाटा – हडपसर – उरुळी कांचन – भिगवण – इंदापूर – टेंभुर्णी – पंढरपूर
स्वयंसेवकांचे मोलाचे योगदान
या भव्य उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गिरीराज उमरीकर, अविनाश चौगुले, अमित पवार, अनुप कोहले, अजित गोरे, अविनाश अनुसे, अभिजीत सरोदे, अजय चौरसिया, दीपक गुरुकुल देविदास खुर्द कपिल पाटील मारुती विधाते, मंदार शेंडे, नितीन पवार, प्रदीप जी टाके, प्रमोद चिंचवडे, प्रणय कडू, प्रतीक पवार, प्रशांत तायडे, पवन आहेर, प्रशांत जाधव रमेश माने राहुल राणे, संतोष नखाते, सुनील चाकू, सुशील मोरे, श्रीकांत चौधरी, तुषार माने, विवेक कडू, योगेश तावरे, सुधाकर टिळेकर, शैलेश पाटील, अमृता पाटील, मनोज काशीद, नारायण मगडूत, मदन शिंदे, हेमंत दांगट पाटील यांच्यासह अनेक स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले.
याशिवाय इंदापूर येथे नगरपालिकेतर्फे नगराध्यक्ष भरतभाई शहा, टेंभुर्णी येथे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय बाबा कोकाटे त्याचप्रमाणे विविध सायकलिंग गट, सामाजिक संस्था, स्थानिक संघटना आणि असंख्य स्वयंसेवकांचे सहकार्य लाभल्याने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. सायकलिंग, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि वारकरी परंपरेचा संगम घडवून आणणाऱ्या या सायकल वारीने समाजात एक सकारात्मक संदेश दिला आहे.



