कर्वेनगरमध्ये रात्रीच्या वेळी घरात घुसून व्यक्तीची हत्या ; मुली व पत्नी समोरच केली हत्या..
कर्वेनगर मधील श्रीमान सोसायटीत घरात घुसून एका व्यक्तीची मुली आणि पत्नीसमोरच हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. काल मध्यरात्री हा प्रकार घडला असून या घटनेमुळे कर्वेनगर हादरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अमोल पंढरीनाथ निवंगुने यांची अज्ञातांनी रात्री घरात घुसून हत्या केली आहे. रात्री उशिरा घराचा दरवाजा वाजवण्यात आल्यानंतर निवंगुने यांनी तो उघडताच त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. त्यांच्या आवाजाने तीन मुली व पत्नी जाग्या होऊन बाहेर आल्या पण हल्लेखोर दागिने, रोख रक्कम व किमती वस्तूंची लूट घेऊन पसार झाले. वडील व पतीची डोळ्यासमोरच हत्या झाल्याने मुली व पत्नीला मोठा धक्का बसला आहे.
निवंगुने हे खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करत होते. हल्लेखोरांनी तोंडाला बांधले असल्याने मुलींना त्यांना ओळखता आले नाही. ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाली का आणखी कोणत्या कारणाने हे स्पष्ट नसले तरी या प्रकारामुळे कर्वेनगर हादरले आहे. वारजे पोलीस पुढील तपास करत आहेत.