प्रस्तावित मेट्रो स्टेशन, बस डेपो व अर्धवट उड्डाणपूल यांच्या चुकीच्या नियोजना विरोधात कोथरूड परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांकडून सह्यांची मोहीम सुरू

पुणे : कोथरूड परिसरात पौड रस्त्यावर चांदणी चौकापर्यंतच्या प्रस्तावित मेट्रो स्टेशन, बस डेपो व अर्धवट उड्डाणपूल यांच्या चुकीच्या नियोजनामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि नागरिकांना त्रास होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः पौड रोड परिसरातील वाढत्या वाहतूक समस्येबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर भुसारी कॉलनी आणि परिसरातील स्थानिक नागरिक, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक, महिला व युवक यांच्या सहभागातून “योग्य नियोजन करा, अन्यथा तीव्र आंदोलन” या मागणीसाठी सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

या मोहिमेद्वारे खालील प्रमुख मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात येणार आहेत :
मेट्रो स्टेशन, बस डेपो व उड्डाणपूल यांचे एकत्रित आणि शास्त्रीय वाहतूक नियोजन करावे.
पौड रोडवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी उपाय जाहीर करावेत.
नागरिक, व्यापारी व तज्ज्ञांसमोर अधिकृत प्रेझेंटेशन घेण्यात यावे.
स्थानिक नागरिकांच्या सूचना व हरकती लेखी स्वरूपात स्वीकाराव्यात.
विकासकामांमुळे होणाऱ्या परिणामांचा सविस्तर अहवाल सार्वजनिक करावा.
नागरिकांच्या भावना लक्षात न घेता घाईघाईने निर्णय घेतल्यास व्यापक लोकआंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
ही सह्यांची मोहीम पुढील काही दिवस परिसरात विविध ठिकाणी राबविण्यात येणार असून सर्व नागरिकांनी यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.सर्व नागरिकांचा एक व्हाट्सॲप ग्रुप तयार झाला आहे
“विकास हवा, पण योग्य नियोजनासह!”“नागरिकांचा आवाज प्रशासनाने ऐकला पाहिजे!”असे आवाहन नागरिकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या वेळी राहुल चव्हाण,निलेश सैंदाणे,विशाल अट्टल,अमित बोत्रे,अनिल चौधरी, विनोद मावाणी ,ज्योती किरण पाटील,मोनीश ठाकूर ,पार्थ सोनवणे आदी उपस्थित होते.



