कर्वेनगर मधील भालेकर उद्यानाबाहेरील कचरा प्रश्नी नगरसेविका तेजश्री पवळे यांनी केली अधिकाऱ्यांची कानउघडणी… स्वतः उभे राहून पदपथ करून घेतला साफ

सिंहासन News च्या वृत्ताची घेतली दखल
पुणे, कर्वेनगर : कर्वेनगर परिसरातील भालेकर उद्यानाबाहेरील पदपथावर मोठ्या प्रमाणावर साचणाऱ्या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. या प्रश्नाबाबत सिंहासन News ने वृत्त आणि व्हिडिओ प्रसारित केल्यानंतर नगरसेविका तेजश्री महेश पवळे यांनी तातडीने दखल घेत महापालिका प्रशासनाला धारेवर धरत अधिकाऱ्यांची कान उघाडणी केली त्याच बरोबर तत्काळ प्रत्यक्ष जागेवर साफसफाईची करून घेत पदपथ कचऱ्यातून मुक्त केला.

भालेकर उद्यानाच्या सीमाभिंतीलगत असलेल्या पदपथावर नियमितपणे कचरा टाकला जात असल्याने त्या ठिकाणी अक्षरशः कचरा डेपो तयार झाला होता. पदपथावर कचऱ्याचे ढीग साचल्याने दुर्गंधी, अस्वच्छता आणि घुशींचा वाढता प्रादुर्भाव यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. सकाळी आणि सायंकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना या परिस्थितीचा मोठा त्रास सहन करावा लागत होता.
स्थानिक नागरिकांच्या मते, काही दिवसांपूर्वी स्वच्छ संस्थेकडून याच ठिकाणी फिडर पॉईंट उभारण्यात आल्याने कचऱ्याचे प्रमाण आणखी वाढले. कचऱ्यामुळे घुशींची संख्या वाढून त्यांनी उद्यानाच्या सीमाभिंतीखाली बिळे केल्याने भिंतीची मजबुतीही धोक्यात आली होती. त्यामुळे भविष्यात अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. काही दिवसांपूर्वी याबाबत लक्ष्मी नारायण सोसायटीच्या वतीने तसेच प्रतीक नलावडे यांच्याकडूनही क्षेत्रीय कार्यालयात तक्रारही देण्यात आली होती.
विशेष म्हणजे पदपथावर मोठ्या प्रमाणात कचरा साचल्यामुळे पादचाऱ्यांना पदपथाऐवजी रस्त्यावरून चालावे लागत होते. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीनेही धोका निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमीवर सिंहासन News ने या प्रश्नावर सविस्तर व्हिडिओ वृत्त प्रसारित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. वृत्त प्रसारित होताच नगरसेविका तेजश्री महेश पवळे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना जागेवर बोलावून घेत कचऱ्याच्या समस्येबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांकडे दुर्लक्ष का करण्यात आले, असा जाबही त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला.
केवळ सूचना देऊन न थांबता पवळे यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून संपूर्ण पदपथाची साफसफाई करून घेतली. काही तासांतच कचऱ्याचे ढीग हटवण्यात आले आणि पदपथ नागरिकांसाठी मोकळा करण्यात आला. स्वच्छ झालेला परिसर पाहून स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून नगरसेविका तेजश्री पवळे यांच्या तत्परतेचे कौतुक केले जात आहे.
तेजश्री पवळे म्हणाल्या की, “नागरिकांच्या आरोग्याशी आणि सुरक्षेशी संबंधित कोणत्याही प्रश्नाबाबत हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. भालेकर उद्यान परिसरातील हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा यासाठी योग्य नियोजन केले जाईल. पदपथावर पुन्हा कचरा साचणार नाही यासाठी आरोग्य विभाग आणि संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.”


