पुणे शहर

कोथरूडमध्ये बांधकाम व्यावसायिकाला पुणे महापालिकेचा दणका ; एकलव्य कॉलेज जवळील बांधकाम प्रकल्पाला स्टॉप वर्क ऑर्डर..

ग्राहकांची फसवणूक केल्याने विकासकावर गुन्हा दाखल करण्याची नगरसेवक किरण दगडे पाटील यांची मागणी

पुणे : कोथरूड परिसरातील डीपी रोडवरील एकलव्य कॉलेजजवळ सुरू असलेल्या एका बांधकाम प्रकल्पाला पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने काम तात्काळ थांबवण्याची नोटीस बजावली आहे. संबंधित जागेच्या मोजणीचा नकाशा भूमी अभिलेख विभागाकडून रद्द करण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास झोन क्रमांक ३ अंतर्गत उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांनी यशोदा डेव्हलपर्सचे भागीदार अनिकेत रामदास ढोरे तसेच परवानाधारक वास्तुविशारद साची अरोरा यांना नोटीस पाठवून बांधकामाचे सर्व काम तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

कोथरूड (नवीन हद्द) येथील सर्व्हे क्रमांक ७९/४/५अ/१ या मिळकतीवर नव्या बांधकामासाठी सीसी/२६३६/२४ या परवानगीनुसार दिनांक ६ डिसेंबर २०२४ रोजी बांधकाम नकाशे मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार यशोदा डेव्हलपर्सकडून निवासी प्रकल्प विकसित करण्यात येत आहे. मात्र, संबंधित जागेच्या मोजणीवर आक्षेप घेत भूमी अभिलेख विभागाकडे अपील दाखल करण्यात आले होते.

सदर मिळकतीवर उप अधिक्षक, भूमि अभिलेख, हवेली यांचे कार्यालयाकडून  दि.०५/०२/२०२४ रोजी देण्यात आलेल्या मोजणी नकाशावर प्रभाकर मुसळे, जिल्हा अधिक्षक, भूमि अभिलेख, पुणे यांचे पिठासनासमोर पंढरीनाथ महिपती बांदल विरूध्द उप अधिक्षक, भूमि अभिलेख, हवेली, सिताराम महिपती बांदल व इतर ३ यांचे अपिल अर्जानुसार दि.०५/०२/२०२४ अन्वये केलेली मोजणीचा नकाशा रद्द करण्यात येत असलेबाबत आदेश काढण्यात आलेले आहेत.

या आदेशाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने संबंधित बांधकाम प्रकल्पाचे काम तात्काळ थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच नोटीस मिळाल्यानंतरही बांधकाम सुरू ठेवल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, मोजणीचा नकाशा रद्द झाल्यानंतरही संबंधित विकासकाकडून बांधकाम सुरू ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच सदर जागेच्या मोजणीबाबतचा वाद न्यायप्रविष्ट असल्याची आणि प्रकरणात गंभीर कायदेशीर अडचणी असल्याची माहिती ग्राहकांपासून लपवून फ्लॅट बुकिंग करण्यात आल्याचा आरोप करत माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी निवेदन देऊन संबंधित विकासकाविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

न्यायालयीन वाद आणि मोजणी संदर्भातील अडचणींची कल्पना असतानाही सर्वसामान्य नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे स्वीकारून फ्लॅट बुकिंग करण्यात आले. त्यामुळे नागरिकांची दिशाभूल झाली असून त्यांच्या आयुष्यभराच्या बचतीची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. नागरिकांना वस्तुस्थितीपासून अंधारात ठेवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करणे हे गंभीर आर्थिक फसवणूक, विश्वासघात आणि कपटपूर्ण व्यवहाराच्या स्वरूपाचे असल्याने संबंधित विकासकावर तात्काळ गुन्हा दाखल करून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी किरण दगडे पाटील यांच्याकडून पोलिसांकडे करण्यात आली आहे.

या संदर्भात बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित बांधकाम व्यावसायिकांना स्टॉप वर्क ची ऑर्डर देण्यात आली असून त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये