उत्तम विनोद आणि बुद्धीरंजन करणाऱ्या रहस्यकथांची निर्मिती आवश्यक : भारत सासणे

मसापचा विशेष साहित्य पुरस्कार प्रदान समारंभ सोहळा साजरा
पुणे : रहस्यकथा बुद्धीरंजनाकडे नेते आणि चांगला विनोद ताण हलका करतो. समाजात जेव्हा द्वेष, त्वेष, संभ्रम, गोंधळाची अवस्था असते. उत्तम आदर्श नसतात. तेव्हा ताणविरहित करणारा उत्तम विनोद आणि बुद्धीरंजन करणाऱ्या रहस्यकथा यांची आवश्यकता असते. लेखक मुकुंद टाकसाळे आणि सौरभ वागळे यांनी आपल्या लेखनातून ही आवश्यकता पूर्ण करावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनी रविवारी येथे केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे उत्कृष्ट विनोदी लेखनासाठीचा पी. जी. वुडहाऊस विशेष साहित्य पुरस्कार प्रसिद्ध लेखक मुकुंद टाकसाळे यांना तर उत्कृष्ट रहस्यकथालेखनासाठीचा अगाथा ख्रिस्टी पुरस्कार सौरभ वागळे यांना सासणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. वुडहाऊस पुरस्कार रा. द. पुसाळकर तर अगाथा ख्रिस्टी पुरस्कार इंदुमती पुसाळकर यांच्या स्मृत्यर्थ पुरस्कृत करण्यात आले आहेत. देणगीदार आणि ज्येष्ठ लेखिका भारती पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मसापचे कार्यवाह सुनील महाजन अध्यक्षपदी होते. कार्यवाह सुनेत्रा मंकणी, अंजली कुलकर्णी हेही उपस्थित होते. सन्मानपत्र, आठ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सासणे यांनी मराठीतील रहस्यकथालेखनाची परंपरा तसेच विनोदी लेखन करणाऱ्या पूर्वसुरींचा आदरपूर्वक उल्लेख करत, विनोदी लेखनाची परंपरा क्षीण झाल्याचा उल्लेख केला. निर्विष विनोद समाजातील ताण कमी करतो. स्वातंत्र्यपूर्व काळात रहस्यकथा शिष्टसंमत मानल्या जात नसत. समाजाला उसंत नसताना बुद्धीरंजन वा मनोरंजन नको वाटते. सध्या विरोधाभासांत विभागलेला समाज दुःखी आहे. तो हसणे विसरला आहे. त्यामुळे टाकसाळे यांनी पुन्हा उत्तम विनोदी कादंबरीलेखन करावे आणि हसण्याचे पुनरुज्जीवन करावे. तुलनेने मराठीत रहस्यकथालेखन चांगले होत आहे. सौरभ यांच्या अल्फा या रहस्यकथानायकाच्या मालिका याव्यात, त्याचे अनुवाद व्हावेत, असेही ते म्हणाले.
मनोगत मांडताना सौरभ वागळे म्हणाले, वडिलांनी रहस्य आणि विज्ञानकथांचा संग्रह केला, म्हणून मला त्या साहित्यप्रकाराची गोडी व छंद लागला. त्यातूनच पुढे माझे लेखन होत गेले. अनिकेत लक्ष्मण फाळके उर्फ अल्फाची ९ पुस्तके सध्या आहेत. वाचकांचा उत्तम प्रतिसाद असल्याने पुढील भागही येत राहतील. माझ्या बाबतीत वाचकांचा सकारात्मक प्रतिसाद हीच प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारी आहे. माझ्या लेखनाचा अगाथा ख्रिस्टी यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे, हा मोठा गौरव आहे.
मुकुंद टाकसाळे यांनी वुडहाऊस यांच्या नावाचा पुरस्कार भारत सासणे यांच्यासारख्या ज्येष्ठ साहित्यिकाच्या हस्ते मिळणे, हा मोठा सन्मान असल्याची भावना व्यक्त केली. वुडहाऊसशी माझे जुने नाते आहे. वुडहाऊस वाचण्याचा सल्ला पुलंनी दिला होता. वुडहाऊसचे प्रवाही लेखन मला आवडते, असे ते म्हणाले. मृणालिनी चितळे यांनी सूत्रसंचालन केले. अंजली कुलकर्णी यांनी आभार मानले.



