राज्यात महापालिका निवडणुक महाविकास आघाडी एकत्र लढणार – संजय राऊत

पुणे: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडीमध्ये कोणताही बेबनाव होऊ नये म्हणून महाविकास आघाडीने नवा फॉर्म्युला ठरवला आहे. ज्या महापालिकेत ज्या पक्षाची ताकद अधिक आहे. त्या पक्षाच्या नेतृत्वात निवडणुका लढायच्या असं महाविकास आघाडीत ठरलं आहे, अशी माहिती शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली. आघाडीच्या या नव्या फॉर्म्युल्यामुळे आघाडी बळकट होणार असून भाजपची मात्र डोकेदुखी वाढण्याची शक्यता अधिक बळावली आहे. Maha Vikas Aghadi will fight together for municipal elections in State – Sanjay Raut
संजय राऊत आज पुण्यात होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राऊत यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तर देतानाच आघाडीचा स्थानिक पातळीवरील समन्वयाचा नवा अजेंडाही सांगून टाकला. आमचं ठरलं आहे. किंबहूना आम्ही निर्णय घेतला आहे. ज्या शहरात… ज्या पालिकेत ज्या पक्षाची ताकद अधिक आहे. तिथे त्या पक्षाने नेतृत्व करावं. इतरांनी त्यांच्या नेतृत्वात लढावं. हा आमचा फॉर्म्युला आहे. त्यानुसार मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद आणि नाशिक या प्रमुख महापालिकांमध्ये शिवसेना पहिल्या क्रमांकावर आहे. शिवसेनाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष असल्याने या पालिका निवडणुकीत शिवसेना नेतृत्व करेल. आघाडीतील इतर पक्ष शिवसेनेसोबत येतील. असं राऊत म्हणाले.

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे नेतृत्व
पुणे आणि पिंपरी-चिंचवड पालिकेत राष्ट्रवादी नंबर एकचा पक्ष आहे. त्यामुळे या दोन्ही महापालिकेची निवडणूक कशा प्रकारे लढायची याबाबत आम्ही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करू. पुणे, पिंपरी-चिंचवडची सत्ता राष्ट्रवादीने घ्यावी. तर मुंबई, ठाण्याची शिवसेना घेईल, असं सांगतानाच आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. आता पुण्यात विधानसभेच्या दोन जागांवर पोट निवडणूक होत आहेत. एक जागा राष्ट्रवादी लढवणार आहे, तर दुसरी शिवसेना लढवणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आमच्यात खेचाखेची नाही
एकत्र निवडणुका लढल्यामुळे काय होतं हे आपण पाहिलं आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांची भूमिका आहे आणि मानसिकताही एकत्र राहण्याची आहे. आमच्यात कोणतीही खेचाखेची नाही. महाराष्ट्रातील सत्ता आम्ही पाच वर्ष पूर्ण करू. तसेच आता स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी एकत्र राहून सत्तेचं वाटप करू, असं ते म्हणाले.



