ई-श्वास फाऊंडेशनच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना २१ अपेक्षित प्रश्नसंच भेट

पुणे : एआयच्या आधुनिक युगात कौशल्य शिक्षणाशिवाय पर्याय नाही. दहावी आणि बारावी शिक्षणाचा मुख्य पाया असून, येथूनच आपली पुढील दिशा ठरते. आधुनिक युगातील बदलाचा अभ्यास आणि पालकांबरोबरच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून मुलांनी योग्य दिशा निवडावी, असा सल्ला इतिहास प्रबिधन समितीचे प्रदेश संयोजक आणि श्री संत सेवा संघाचे संस्थापक सदस्य योगेश थत्ते यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.
ई-श्वास फाऊंडेशनच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना २१ अपेक्षित प्रश्नसंच भेट देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी चितळे बंधूचे सर्वेसर्वा संजय चितळे, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुध्दे, प्राध्यापक पुनम परदेशी, फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी स्वीकृत सभासद अमित अग्रवाल उपस्थित होते. यावेळी गरजू विद्यार्थ्यांला शाळेच्या फीचा चेक मान्यवरांच्या हस्ते सूपूर्त करण्यात आला. संजय चितळे म्हणाले, दहावी आणि बारावी हा शिक्षणातील महत्वाचा टप्पा आहे. आत्मविश्वास हा यशाचा पाया असून, यशाची शिखरे गाठताना हाच आत्मविश्वास आपल्यामध्ये नेहमी असावा. त्यामध्ये खचून जावू नका, दोन चार टक्के कमी पडले तर निराश होऊ नका. पुन्हा त्याच आत्मविश्वासाने उभे राहून यशाकडे वाटचाल करा.

प्रा. पुनम परदेशी म्हणाल्या, सराव परीक्षा विद्यार्थ्यांना मुख्य परिक्षेसाठी अधिक सक्षम बनवतात. जितके अधिक प्रश्न सोडवाल तेवढा सराव होईल आणि त्याचा फायदा केवळ शालेय जीवनातच नव्हे तर भविष्यात स्पर्धा परिक्षांमध्येही होतो. त्यासाठी तणाव घेऊ नये, तणामुळे अभ्यासावर आपले लक्ष केंद्रीत होवू शकत नाही. सकारात्मक विचारातून सकारात्मक घडते आणि यशाची शिखरे गाठताना आत्मविश्वासही वाढतो. माधुरी सहस्त्रबुध्दे म्हणाल्या, दहावी-बारावीचे वर्षे विद्यार्थ्यांना जीवनाला कलाटणी देणारे असते. त्यामुळे या वयात आपली जबाबदारी ओळखून, योग्य मार्गाने शिक्षणाचा प्रवास सुरू ठेवावा. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित अग्रवाल यांनी केले. सुत्रसंचालन प्रसाद भारदे आणि मंगेश दळवी यांनी आभार मानले



