गोव्यात भाजपला धक्का; उत्पल पर्रिकर अपक्ष लढणार

पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पणजी मतदारसंघातून दावेदारी केली होती. मात्र भाजपने त्यांना तिकीट नाकारत बाबुश मोन्सेरात यांना पणजीतून उमेदवारी देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता उत्पल पर्रिकर यांनी भाजपविरोधात बंडाचा झेंडा फडकवला आहे. त्यांनी पणजीमधून अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
‘मी खूप मोठी रिस्क घेत आहे. मी फार कठीण मार्ग निवडला आहे. माझ्या करिअरवर खूपजणांनी चिंता व्यक्त केली. माझ्या राजकीय भवितव्याची कुणी चिंता करू नये, गोव्याची जनता माझी चिंता करेल’, असंही उत्पल पर्रीकर म्हणाले.
उत्पल पर्रिकर यांनी सांगितले की, मी विधानसभेच्या पणजी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहे. दरम्यान, उत्पल पर्रिकर यांच्या उमेदवारीमुळे गोवा विधानसभेच्या निवडणुकीला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेनेनेही उत्पल पर्रिकर हे अपक्ष लढल्यास त्यांना पाठिंबा देण्याची घोषणा केल्याने पणजी मतदारसंघातही रंगतदार लढाई होण्याची शक्यता आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते असलेले मनोहर पर्रिकर हे पणजी मतदारसंघातून सातत्याने निवडून येत होते. मात्र मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पणजी मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला होता, तर काँग्रेसचे बाबुश मोन्सेरात विजयी झाले होते. मात्र नंतर मोन्सेरात यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता भाजपने उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी नाकारत मोन्सेरात यांनाच उमेदवारी जाहीर केली. तसेच उत्पल पर्रिकर यांच्यासमोर पणजीऐवजी इतर मतदारसंघातून लढण्याचा पर्याय पक्षनेतृत्वाने दिला होता. मात्र उत्पल पर्रिकर पणजीतून निवडणूक लढवण्यावर ठाम होते. अखेरीस त्यांनी पणजीतून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
उत्पल पर्रिकरांचं काम नसल्याने त्यांना पणजी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी नाकारण्यात आली, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली होती. भाजपचे बंडखोर नेते उत्पल पर्रिकर यांनी फडणवीसांच्या या आरोपावर पलटवार केला आहे. माझं काम नव्हतं तर इतर मतदारसंघाचे पर्याय कसे दिले? असा सवाल उत्पल पर्रिकर यांनी केला आहे.
उत्पल पर्रिकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करत पणजीतून अपक्ष उमदेवार म्हणून लढणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे पणजीत भाजपची डोकेदुखी वाढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आपण अपक्ष उमेदवार लढणार असल्याचं जाहीर करतानाच उत्पल यांनी देवेंद्र फडणवीसांवरही पलटवार केला आहे. मी कोणत्याही पक्षाचे पर्याय स्वीकारले नाहीत. माझे वडील फायटर होते. त्यामुळे मीही लढायचं ठरवलं आहे. माझं पणजीत काम नव्हतं तर मला इतर ठिकाणचे पर्याय का देण्यात आले? असा सवाल त्यांनी केला.
मनोहर पर्रिकरांचा मुलगा म्हणून तिकीट मागायचे असते तर मागच्यावेळीच मागितलं असतं. मात्र मागच्यावेळी पार्टीने जे सांगितलं तेच मी केलं. वडील सक्रिय असताना मी कधीच पुढे पुढे केलं नाही. वडिलांचं वजन वापरलं नाही. आता पक्षाने पणजीत असा उमेदवार दिला त्यावर बोलायला लाज वाटते. त्यामुळे मला पर्याय राहिला नाही मी निवडणूक लढत आहे. माझ्या वडिलांसोबतचे सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, असा दावा त्यांनी केला.

यावेळी त्यांना शिवसेना आणि आपच्या ऑफरबाबतही विचारण्यात आलं. त्यावर माझ्या पार्टीच्या ऑफर घेतल्या नाही मी इतर पक्षाच्या ऑफरचा विचारही करू शकत नाही. मला लोकांना पर्याय द्यायचा आहे. माझ्यासाठी पर्याय मागत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
अपक्ष निवडणूक लढत आहात, तर तुम्ही भाजप सोडणार का? असा सवाल त्यांना विचारण्यात आला. त्यावर माझ्या मनात भाजप रोज असणार. भाजपने मला सोडलंय का ते तुम्ही त्यांनाच विचारा, असं सांगत उत्पल यांनी भाजपच्या कोर्टात चेंडू टाकला.
मतदारांनी केवळ मनोहर पर्रिकरांना मतदान दिलं होतं. कारण पर्रिकर हे मूल्यांच्या बाजूने होते. त्यामुळे मी या मुद्द्यांच्या बाजूने आहे. माझ्या वडिलांनी पक्ष मजबूत केला. मलाही पणजीत मजबूत करायचा आहे. मला पणजीतून उमेदवारी दिली नाही. केवळ संधी साधुला तिकीट दिलं आहे, असे पर्रीकर यांनी सांगितले.



