पुण्यात उद्यापासून पुन्हा पाणीकपात महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची घोषणा

पुणे : पावसाने विश्रांती घेतल्याने उद्या (बुधवार) १५ जुलैपासून पुन्हा दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले. हवामान खात्याने यंदाच्या वर्षी कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला असून, धरणांमध्ये उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी सध्या तरी पाणीकपात करणे आवश्यक असल्याने हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे आयुक्त राम यांनी स्पष्ट केले.
गेल्या आठवड्यात शहर तसेच धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या खडकवासला धरण साखळीत १६.८९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र पावसाने विश्रांती घेतली असून, हवामान खात्यानेही कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन व वापर आवश्यक असल्याने उद्यापासून पुन्हा दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

जून महिन्यात धरण साखळीत केवळ साडेतीन टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिल्याने महापालिकेने दिवसाआड पाणी देण्यास सुरुवात केली. १५ जूनपासून याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली.
धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने महापालिका प्रशासनाने १५ जूनपासून पुणेकरांना दिवसाआड पाणी देण्यास सुरुवात केली. त्यासाठी महापालिकेने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक तयार करून सम आणि विषम तारखांना पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या भागांची माहिती जाहीर केली. त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती. मात्र, पालख्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाला स्थगिती देऊन १२ जुलैपर्यंत नियमित पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
अधिक माहिती देताना महापालिका आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, शहराची वाढती लोकसंख्या, पाण्याची वाढणारी मागणी लक्षात घेता उन्हाळ्यापर्यंत पुरेल इतके पाणी शिल्लक ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे पुन्हा पाणीकपात लागू करावी लागणार आहे. धरणे शंभर टक्के भरेपर्यंत कपात सुरू ठेवावी लागणार आहे.
दरम्यान, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पुण्यात मुक्कामी येणार असल्याने महापालिकेने ७ ते १२ जुलै दरम्यान पाणीकपात रद्द करून नियमित पाणी देण्यास सुरुवात केली. पुढील निर्णय होईपर्यंत ही पाणीकपात स्थगित ठेवून नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.
‘पावसाने घेतलेली विश्रांती आणि हवामान खात्याने कमी पाऊस पडण्याचा व्यक्त केलेला अंदाज यामुळे महापालिकेला निर्णय घेणे आवश्यक आहे. सध्या धरणात १६.८९ टीएमसी पाणी शिल्लक आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ४.१२ टीएमसीने कमी आहे. यासाठी पुन्हा दिवसाआड पाणीकपात केली जाणार आहे,’ असे आयुक्त राम यांनी सांगितले.



