बावधनकरांसाठी मोठा दिलासा ! मॅरीगोल्ड ते SNBP शाळेपर्यंतच्या डीपी रस्त्याच्या कामाला आज रात्रीपासून होणार सुरुवात..

नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; हजारो नागरिकांसह विद्यार्थ्यांचा प्रवास होणार सुरक्षित आणि सुकर!
पुणे : बावधन बुद्रुक परिसरातील मॅरीगोल्ड ते SNBP शाळेपर्यंतच्या डी पी रस्त्याच्या प्रलंबित कामाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला आज रात्रीपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्रस्त असलेल्या बावधनकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मॅरीगोल्ड ते SNBP शाळेपर्यंतचा हा रस्ता अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. रस्त्याची दुरवस्था झाल्याने या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. विशेषतः शाळेत ये-जा करणारे बावधन, कोथरूड परिसरातील विद्यार्थी, पालक आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत होती.

या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर स्टारगेज सोसायटी, पद्मावती सोसायटी, आयरिस सोसायटी तसेच SNBP शाळेतील विद्यार्थी, पालक आणि परिसरातील हजारो नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. वाहतुकीचा प्रश्न सुटण्यासोबतच विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि नागरिकांची ये-जा अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.



या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी स्थानिक नागरिकांना सोबत घेत रस्ता मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला. रस्त्याच्या कामातील महत्त्वाचा अडथळा दूर करण्यासाठी संबंधित जागामालकांशी चर्चा करून सहकार्याचे आवाहन करण्यात आले. त्यांच्या सकारात्मक प्रतिसादातून मार्ग काढण्यात आला.
दरम्यान, आज पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम, मालमत्ता आणि पथ विभागातील संबंधित अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष जागेची पाहणी करण्यात आली. त्यानंतर आज रात्रीपासूनच कामाला सुरुवात करण्याचे निश्चित झाले आहे.
अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने बावधन परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.
नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवणे, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि परिसराचा नियोजनबद्ध विकास यांना प्राधान्य देत प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध असल्याची भूमिका नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी व्यक्त केली.












