पालखी सोहळ्यात जेजुरी मार्गावर अपघात.. ट्रक दिंडीत घुसला, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू

पुणे : पुणे जिल्ह्यातील जेजुरी मार्गावर आषाढी वारीदरम्यान सोमवारी सकाळी अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. सासवड–जेजुरी मार्गावर ट्रक वारकऱ्यांच्या दिंडीत घुसल्याने तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक वारकरी गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेमुळे वारी मार्गावर काही काळ शोककळा पसरली असून परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडहून जेजुरीकडे प्रस्थान करत असताना वारकरी मोठ्या भक्तिभावाने पायी चालत होते. त्याचवेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट वारकऱ्यांच्या दिंडीत घुसला. अचानक झालेल्या या धडकेमुळे अनेक वारकरी रस्त्यावर फेकले गेले आणि घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सासवड जेजुरी मार्गावर बेलसर फाट्याजवळ ही घटना घडली आहे.
या भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच सुमारे १५ ते १६ वारकरी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींवर डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक वेगाने येत होता. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटताच तो थेट दिंडीत घुसला आणि काही क्षणांतच आनंदी वारीचे वातावरण शोकमय झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिक, वारकरी आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना रुग्णवाहिकांच्या माध्यमातून उपचारासाठी हलविण्यात आले.
प्राथमिक माहितीनुसार, मृत महिला वारकरी सांगली जिल्ह्यातील दिग्रस परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचे नेमके कारण काय, चालकाचे वाहनावरील नियंत्रण कशामुळे सुटले आणि या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या कारणांचा तपास सुरू करण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
आज सासवड–जेजुरी मार्गावर झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी आहे. या अपघातात ज्या तीन वारकरी भगिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे.
जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली असून त्यांच्या उपचारात कोणतीही कमतरता राहणार नाही, याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.
पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना चालणाऱ्या वारकऱ्याची काळजी घ्यावी.
खासदार सुप्रिया सुळे जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात..
खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हंटले आहे की, वारीत जेजुरी जवळ अपघात झाल्याची घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. या अपघातात काही वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाले आहेत. मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. या अपघाताबाबत मी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्याकडून माहिती घेतली असून, जखमींच्या उपचारांसंदर्भात पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे. जखमींवर योग्य ते उपचार करावेत अशा सूचना देखील त्यांना दिल्या आहेत. दरम्यान, जेजुरीजवळ घडलेली ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वाहनांसंदर्भात विशेष काळजी घेण्याबाबत शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. त्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा आणि यापुढील वारी निर्विघ्नपण पार पाडण्याबाबत शासनाने अधिक खबरदारी घ्यावी,



