खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादीची नव्या रणनीतीची तयारी ; लवकरच होणार चिंतन शिबिर : बाबा धुमाळ

पुणे : पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळापर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेणे आणि संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात लवकरच चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी दिली.
यासंदर्भात नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीस आजी-माजी नगरसेवक, विविध सेलचे पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीदरम्यान अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना, अपेक्षा आणि पक्ष संघटनेबाबतच्या सूचना मांडल्या. पक्षाची आगामी दिशा, धोरणे आणि संघटनात्मक बांधणी यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी बोलताना बाबा धुमाळ म्हणाले की, खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांचे एक व्यापक चिंतन शिबिर आयोजित करण्यात येणार असून, त्यामध्ये कार्यकर्त्यांच्या भावना, मागण्या आणि सूचना संकलित करून त्या पक्षश्रेष्ठींसमोर मांडल्या जाणार आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच प्रदेशाध्यक्षांकडेही या सूचना पोहोचवल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच महाराष्ट्र शासनाच्या एसआयआर कार्यक्रमाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पक्षामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. प्रत्येक ठिकाणी बीएलए नियुक्त करून नागरिकांना या कार्यक्रमाची माहिती व उद्दिष्टे समजावून सांगितली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय पक्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर करून प्रभागनिहाय बैठका आयोजित करण्यात येणार आहेत. विशेषतः युवकांना मोठ्या प्रमाणात पक्ष संघटनेत सहभागी करून घेण्यावर भर देण्यात येणार आहे. अजित दादांच्या दुर्दैवी निधननंतर पक्षामध्ये आलेली मरगळ दूर करण्यासाठी सुनेत्रावहिनी, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे,युवा नेतृत्व खा. पार्थदादा पवार च्या नेतृत्वाखाली मतदार संघात पक्ष पुन्हा एकदा बळकट करण्यासाठी सर्वाना बरोबर घेऊन पक्ष संघटना वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत त्यासाठी पक्षातील आजी माजी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन कामाला लागावे असे आवाहन बाबा धुमाळ यांनी केले.



