कंत्राटी सफाई कामगारांचा पुणे महापालिकेवर आक्रोश मोर्चा

बोनसच्या नुकसानभरपाईसाठी ‘प्रोत्साहन भत्ता’ देण्याची मागणी; निर्णय स्थायी समितीत घेण्याची प्रशासनाची हमी
पुणे : कंत्राटी सफाई कामगारांचा बंद झालेला बोनस दिवाळीपूर्वी सुरू करावा, तसेच बोनसच्या रकमेइतका किंवा त्यापेक्षा अधिक ‘प्रोत्साहन भत्ता’ देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त)च्या वतीने मंगळवारी (२७ ऑक्टोबर) महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ‘कंत्राटी सफाई कामगारांचा आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला.
केंद्र सरकारच्या बोनस कायद्यानुसार २१ हजार रुपयांची वेतन मर्यादा पार केल्याने कंत्राटी कामगारांना मिळणारा बोनस बंद झाला आहे. यापूर्वी हा बोनस त्यांच्या वेतनामध्ये दरमहा देण्यात येत होता. बोनस बंद झाल्यामुळे प्रत्येक कंत्राटी कामगाराचे दरमहा सुमारे १,७५० रुपयांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा दावा युनियनने केला आहे.

या प्रश्नाबाबत पुणे महानगरपालिका कामगार युनियनने प्रशासनाशी सातत्याने पत्रव्यवहार केला असून महापौर, उपमहापौर, सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधी, महापालिका आयुक्त तसेच संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन पाठपुरावा केला. ९ सप्टेंबर आणि १६ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीतही सकारात्मक चर्चा झाली. मात्र, अद्याप अंतिम निर्णय न झाल्याने कंत्राटी कामगारांमध्ये नाराजी आणि असंतोष निर्माण झाल्याचे युनियनने सांगितले.
यापूर्वी कंत्राटी कामगारांचा बोनस, घरभाडे भत्ता आणि रजावेतन बंद करण्यात आले होते. याविरोधात युनियनने संघर्ष करत न्यायालयातही दाद मागितली होती. त्यानंतर प्रशासनाकडून हे लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. आता बोनस कायद्यातील तरतुदींमुळे बोनस देणे शक्य नसल्यास, कंत्राटी कामगारांचे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी बोनसच्या रकमेइतका किंवा त्यापेक्षा अधिक प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, अशी मागणी युनियनने केली आहे.
आंदोलनाला मार्गदर्शन करताना युनियनचे अध्यक्ष कॉ. उदय भट यांनी कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर प्रशासन आणि ठेकेदारांवर जोरदार टीका केली. पुणे शहर स्वच्छ ठेवण्याची मोठी जबाबदारी कंत्राटी कामगार पार पाडत असताना त्यांचे आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप त्यांनी केला.



काही ठेकेदारांकडून कंत्राटी कामगारांचा भविष्य निर्वाह निधी (पीएफ) जमा करण्यात आलेला नसल्याचा तसेच नवीन कामगारांची पीएफ खातीही उघडण्यात आलेली नसल्याचा आरोप कॉ. उदय भट यांनी केला. महापालिकेने मान्य केलेल्या निविदांच्या अटी-शर्तींचे पालन होत नसल्याचेही त्यांनी सांगितले. “कंत्राटी कामगारांना माणूस म्हणून वागणूक द्यावी. एकाही कंत्राटी कामगाराचा रोजगाराचा हक्क हिरावून घेतला तर ते सहन केले जाणार नाही,” असा इशारा भट यांनी दिला.



यावेळी प्रोत्साहन भत्ता देण्याबाबतचे निवेदन अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रदीप नायर यांना देण्यात आले. या मागणीवर स्थायी समितीमध्ये निर्णय घेण्यात येईल, अशी हमी प्रशासनाकडून शिष्टमंडळाला देण्यात आल्याचे युनियनने सांगितले.
युनियनचे कार्याध्यक्ष कॉ. मधुकर नरसिंगे, जॉईन्ट सेक्रेटरी कॉ. वैजीनाथ गायकवाड, उपाध्यक्ष कॉ. करुणा गजधनी, कॉ. दिलीप कांबळे, कॉ. सिद्धार्थ प्रभुणे, कॉ. जयश्री भिसे, कॉ. शोभा बनसोडे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलनाला मार्गदर्शन केले.
तसेच विभागीय अध्यक्ष कॉ. तानाजी रिकीबे, कॉ. धनंजय आयवळे, कॉ. राम अडागळे, कॉ. देवनाथ सद्भैया, कॉ. रमेश पारसे, कॉ. अशोक कांबळे, सचिव राजेश पिल्ले, प्रमिला वाघमारे, सविता पारधे, सतीश करडे, संतोष चव्हाण, नितीन ससाणे, संजय रासगे, सुनील कांबळे, आण्णा ढावरे, अनिल पवार, सुनील मुलकुल, अरुण शेलार यांच्यासह मोठ्या संख्येने कंत्राटी कामगार उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकाश चव्हाण यांनी केले, तर समारोप कॉ. दिलीप कांबळे यांनी केला.



