कोथरूडमध्ये डेंग्यू नियंत्रणासाठी प्रभावी स्वच्छता व औषध फवारणी करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा- गिरीश गुरनानी

कोथरूडमध्ये डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावावरून प्रशासनाला जाब; तातडीच्या उपाययोजनांची मागणी
पुणे : कोथरूड परिसरात डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने कोथरूड विधानसभा अध्यक्ष गिरीश गुरनानी यांच्या अध्यक्षतेखाली कोथरूडचे सहाय्यक आयुक्त सुहास जाधव यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.
गिरीश गुरनानी म्हणाले, कोथरूड परिसरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, परिसरातील स्वच्छता नियमित व प्रभावीपणे राखावी, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी औषध फवारणी करावी तसेच साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी विशेष लक्ष देऊन डेंग्यूचा प्रसार रोखावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

डेंग्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रश्नावर कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही. प्रशासनाने त्वरित उपाययोजना न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या वेळी प्रियंका तांबे, सचिन यादव, सीताराम तोंडे पाटील, अधिराज कसबे, अमोल गायकवाड यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोथरूड परिसर डेंग्यूमुक्त करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली.



