पुणे शहर

कोथरूडमध्ये बांधकाम साइटवर सिलिंडरचा स्फोट; शेजारील सोसायटीच्या काचा फुटल्या

सुदैवाने जीवितहानी टळली; अग्निशमन दलाच्या तत्परतेने १५ मिनिटांत आग आटोक्यात

पुणे : कोथरूडमधील एकलव्य कॉलेजजवळील पूजा पार्क परिसरात काळे कन्स्ट्रक्शनच्या  ‘श्रीपाद’ या बांधकाम  साइटवर तळ मजल्यावर  कामगार राहत असलेल्या ठिकाणी सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती की, शेजारील अतुल्य सोसायटीमधील काही फ्लॅट्सच्या खिडक्यांच्या काचांना तडे गेले व त्या फुटल्या. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच कोथरूड अग्निशमन दल व एनडीए अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले.  जवानांनी अवघ्या १५ मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवत संभाव्य मोठा धोका टाळला. प्रभारी अधिकारी सचिन शिंदे  तांडेल चंद्रकांत गावडे, ड्रायव्हर महेश शिळीमकर, फायरमन संतोष भोसले, पंढरीनाथ उभे, सूरज माने, आदर्श शिंदे, संकेत कारंडे यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

मात्र, स्फोटाच्या मोठ्या आवाजामुळे आणि त्यानंतर सोसायटीतील फ्लॅट्सच्या काचा फुटल्याने अतुल्य सोसायटीमधील रहिवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. बांधकाम साइट अगदी रहिवासी सोसायटीच्या शेजारी असल्याने नागरिकांनी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

बांधकाम साइटवर कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत का, सिलिंडरचा सुरक्षित पद्धतीने वापर केला जात आहे का, तसेच अग्निसुरक्षेची पुरेशी व्यवस्था आहे का, याची तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. याशिवाय बांधकाम परिसरातील स्वच्छता आणि सुरक्षेसंदर्भातील नियमांचेही योग्य पालन होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

बांधकामाच्या ठिकाणी घडणारी छोटीशी दुर्घटनाही मोठ्या संकटाला निमंत्रण देऊ शकते. विशेषतः रहिवासी सोसायट्यांच्या अगदी जवळ असलेल्या बांधकाम साइटवर कामगारांची सुरक्षा, सिलिंडरचा सुरक्षित वापर, अग्निशमन यंत्रणा आणि परिसरातील स्वच्छता याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

या घटनेची सखोल चौकशी करून बांधकाम साइटवरील सुरक्षा व्यवस्थेची तपासणी करावी, झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीची दखल घ्यावी आणि संबंधित नियमांचे पालन होत आहे की नाही, याची खातरजमा करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

भविष्यात अशा घटना घडून कामगारांसह शेजारील नागरिकांच्या जीविताला आणि मालमत्तेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

Img 20260222 wa0006893553232066122087

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये