पुणे शहर

सुमारे २५ गावातील हॉटेल्स, फार्महाऊसचे सांडपाणी थेट खडकवासला धरणात अमोल बालवडकरांकडून पुन्हा पोलखोल 

दुषित पाण्यामुळे पुणेकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

पुणे : खडकवासला धरणातील पाणी दूषित होत असल्याचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी खडकवासला पाणलोट क्षेत्रातील जवळपास २५ गावांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया न करता थेट धरणात सोडले जात असल्याची बाब समोर आणली आहे. यामुळे पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याची शुद्धता आणि आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

नगरसेवक अमोल बालवडकर यांनी खडकवासला परिसरातील कुडजे गावाला भेट देऊन ग्रामस्थ, आजी-माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांशी संवाद साधला. येथील हॉटेल्स, रेस्टॉरंट, फार्महाऊस आणि इतर व्यावसायिक आस्थापनांकडून सांडपाणी थेट धरणाच्या जलस्रोतांमध्ये सोडले जात असल्याचे त्यांना आढळले. गोऱ्हे बुद्रुक, गोऱ्हे खुर्द, सिंहगड पायथा, खानापूर, मांडवी आणि कुडजे या गावांमधील काही आस्थापनांचा यात उल्लेख आहे. या परिस्थितीमुळे पुणेकर किती दूषित पाणी पित आहेत, याची प्रचिती येते, असे बालवडकर यांनी सांगितले. त्यामुळे सध्या अनेक आजारांचे प्रमाण वाढले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Addaheading 20261008 091048 0001

खडकवासला धरण हे पुणे शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत आहे. त्यामुळे या प्रदूषणाचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याने हा प्रश्न अत्यंत चिंताजनक बनला आहे, यापूर्वीही ड्रोन व्हिडिओद्वारे सांडपाणी मिसळण्याचे पुरावे समोर आणले होते. महापालिकेच्या मुख्य सभेतही हा मुद्दा गाजला असून, राष्ट्रवादी नगरसेवकांनी महापौर मंजूषा नागपुरे आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना वॉटर प्युरिफायर भेट देत “आश्वासने नकोत, शुद्ध पाणी हवे” अशी मागणी केली होती.

कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी

अमोल बालवडकर म्हणाले, या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्य शासन, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पुणे महानगरपालिकेने समन्वयाने पुढाकार घ्यावा, अशी ठाम मागणी बालवडकर यांनी केली आहे. खडकवासला पाणलोट क्षेत्रातील ग्रामपंचायतींना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच पाणलोट क्षेत्रात २४ तास देखरेख व गस्तीसाठी महानगरपालिकेने स्वतंत्र पथक नेमावे, अशीही त्यांची मागणी आहे.

“पुणेकरांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी मिळावे यासाठी आता ठोस आणि तातडीच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा येणारा काळ पुणेकरांसाठी खूप भयानक असणार आहे,” असे बालवडकर यांनी सांगितले.

खडकवासला पाणलोट क्षेत्रात सुमारे २३-२५ गावे येतात. येथील नागरीकरण आणि व्यावसायिक विकास वाढल्याने सांडपाण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट धरणात मिसळल्याने पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची चिंता पर्यावरणवाद्यांकडूनही व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही प्रदूषण नियंत्रण मंडळाने नाल्यांचे सर्वेक्षण आणि एसटीपी प्रकल्पांबाबत चर्चा केली होती, मात्र अंमलबजावणीला गती मिळणे गरजेचे आहे.

महापालिका प्रशासनाने याबाबत तातडीने तपासणी करून दोषी आस्थापनांवर कारवाई करावी आणि पाण्याच्या नियमित चाचण्या करून नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठ्याची खात्री द्यावी, अशी अपेक्षा सर्वंकष व्यक्त केली जात आहे. पुणेकरांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. असेही बालवडकर म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये