पुणे शहर

रस्त्यांवर खड्डे, अपघातांत बळी; तरीही आवाज दाबला जातोय?

मुख्य सभेत बोलू न दिल्याचा अमोल बालवडकरांचा आरोप; प्रशासनाच्या कारभारावर संताप

पुणे : शहरातील जीवघेणे खड्डे, अपूर्ण रस्ते, वाढते अपघात आणि अपघातग्रस्तांना मदतीसाठी ठोस धोरण नसल्याचे मुद्दे पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत मांडणार होतो पण जाणीवपूर्वक बोलण्याची संधी नाकारण्यात आल्याचा आरोप नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केला आहे. त्यामुळे बालवडकर आणि भाजपमधील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे.

“पुणेकरांच्या जीवाशी खेळ सुरू असताना हे प्रश्न सभागृहात मांडू दिले जात नसतील, तर नागरिकांच्या प्रश्नांना न्याय कोण देणार?” असा सवाल बालवडकर यांनी उपस्थित केला.

Img 20260222 wa00064513382578852640289

कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. शहरातील विविध रस्त्यांवर पडलेले खड्डे अपघातांना कारणीभूत ठरत असून निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यावर आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला असूनही प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप बालवडकर यांनी केला.

आपल्या प्रभागातील नांदे-म्हाळुंगे रस्त्याची अवस्थाही गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. या रस्त्यावर झालेल्या अपघातांमध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, अपघातग्रस्त तसेच मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी महापालिकेकडे ठोस आणि स्पष्ट भरपाई धोरणच नसल्याने नागरिकांनी मदतीसाठी कुणाकडे पाहायचे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

१२ लाखांचा उपचार खर्च; PMPMLकडून मात्र साधी विचारपूसही नाही

२० ऑगस्ट रोजी PMPML बसच्या अपघातात एका सायकलस्वाराचा हात गंभीर जखमी झाला. त्याच्या उपचारासाठी तब्बल १२ लाख रुपयांचा खर्च झाला. मात्र, PMPML प्रशासनाने साधी विचारपूसदेखील केली नसल्याचे बालवडकर यांनी सांगितले. या प्रकरणात पाठपुरावा केल्यानंतर नुकत्याच झालेल्या स्टँडिंग कमिटीच्या बैठकीत पाठपुरावा केल्यानंतर ५० हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. लाखो रुपयांचा उपचार खर्च आणि त्याच्या तुलनेत मिळणारी मदत यातील तफावत पाहता प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले.

“MACTची तरतूद असताना प्रशासन हातावर हात ठेवून का?”

MACT कायद्यांतर्गत अपघातग्रस्तांना मदतीची तरतूद असतानाही महापालिका आणि संबंधित प्रशासनाने संवेदनशीलतेने पुढाकार घेणे आवश्यक आहे. अपघात झाल्यानंतर कुटुंबीयांना आर्थिक मदतीसाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी तातडीची मदत आणि भरपाईची स्पष्ट यंत्रणा उभी करण्याची गरज असल्याचे बालवडकर यांनी सांगितले.

मात्र, आजच्या मुख्य सभेत हे प्रश्न आपण मांडणार होतो.  पण जाणीवपूर्वक बोलण्याची संधी देण्यात आली नाही, असा गंभीर आरोप बालवडकर यांनी केला. या प्रकाराचा तीव्र निषेध करत त्यांनी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

“पुणेकरांच्या जीवाशी खेळ थांबवा. रस्ते सुरक्षित करा. अपघात रोखण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करा आणि अपघातग्रस्त तसेच मृतांच्या कुटुंबीयांसाठी स्पष्ट मदत व भरपाई धोरण निश्चित करा,” अशी मागणी अमोल बालवडकर यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये