माझा बाप्पा… माझ्या हाताने!
कोथरूडच्या विद्यार्थ्यांनी घडवला पर्यावरणपूरक बाप्पा!”

दिवा प्रतिष्ठान आणि स्ट्रोक्स फाउंडेशनचा उपक्रम..नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांच्या कडून विद्यार्थ्यांचे कौतुक
कोथरूड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कोथरूड परिसरात अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. केळेवाडी येथील पुणे महापालिकेच्या कै. मामासाहेब मोहोळ शाळा तसेच जय भवानीनगर येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयात दिवा प्रतिष्ठान आणि स्ट्रोक्स फाउंडेशन यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी शाडूच्या मातीपासून गणपती मूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध आकार, रूप आणि कल्पकतेचा वापर करत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने गणेशमूर्ती साकारल्या. शाडूच्या मातीला आकार देताना विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. बाप्पाची मूर्ती घडविण्याच्या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांना पारंपरिक कलेचा अनुभव मिळण्याबरोबरच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्वही समजावून सांगण्यात आले.

यावेळी नगरसेवक तथा दिवा प्रतिष्ठानचे संस्थापक हर्षवर्धन मानकर यांनी विद्यार्थ्यांच्या कार्यशाळेत सहभागी होत त्यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणेशमूर्तींची पाहणी करून त्यांनी त्यांच्या कलाकौशल्याचे आणि कल्पकतेचे कौतुक केले. स्वतःच्या हाताने गणेशमूर्ती साकारताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि उत्साह पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
हर्षवर्धन मानकर म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या कल्पकतेनुसार गणेशमूर्ती साकारली असून त्यांच्या कलागुणांचे मनापासून कौतुक आहे. गणेशोत्सव हा श्रद्धेचा उत्सव असला तरी तो पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करणे ही देखील आपली जबाबदारी आहे.”
ते पुढे म्हणाले, “दिवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ देण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश त्यांच्या मनावर रुजविणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. लहान वयातच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची सवय आणि जाणीव निर्माण झाली, तर त्याचा सकारात्मक परिणाम पुढील पिढीवर निश्चितपणे होईल.”
विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या कल्पकतेतून विविध आकर्षक गणेशमूर्ती तयार केल्या. त्यामुळे कार्यशाळेच्या ठिकाणी गणेशभक्ती, सर्जनशीलता आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम पाहायला मिळाला..









