कोथरूडमध्ये महिला दहीहंडीचा जल्लोष; २५ हजार महिलांनी घेतला उत्सवाचा मनमुराद आनंद

महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ओम चॅरिटेबल ट्रस्टचा अनोखा उपक्रम
कोथरूड : पारंपरिक दहीहंडी उत्सवाला स्त्रीशक्तीचा नवा आयाम देत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ओम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कोथरूड येथील जीत मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या महिला दहीहंडी उत्सवाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो महिलांच्या उपस्थितीत मैदानावर उत्साह, जल्लोष आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. यंदाचे महिला दहीहंडीचे हे चौदावे वर्ष होते.
मनसे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा माजी नगरसेवक किशोर शिंदे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात येत असलेल्या या महिला दहीहंडीत महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. महिला सुरक्षारक्षक आणि मनसैनिकांच्या सुरक्षा कवचात हा दहीहंडीचा कार्यक्रम होत असल्याने दरवर्षी कोथरूड परिसरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी होत दहीहंडीचा मनमुराद आनंद लुटत असतात.

यंदा मुंबईतील चेंबूर येथील अमर ज्योत सेवा मंडळाच्या गोपीका पथकाने दहीहंडी फोडताच उपस्थित महिलांनी एकच जल्लोष केला. उत्साहाने भरलेले वातावरण आणि दहीहंडी फुटल्यानंतर झालेला जल्लोष यामुळे संपूर्ण परिसर स्त्रीशक्तीच्या उत्साहाने दुमदुमून गेला.
महिलांसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित वातावरणात आयोजित केला जाणारा हा उत्सव दरवर्षी महिलांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. घर, नोकरी, व्यवसाय आणि कुटुंब अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या महिलांना उत्सवाचा मनमोकळेपणाने आनंद घेता यावा, यासाठी या दहीहंडीचे आयोजन केले जाते. त्यामुळे अनेक महिला दरवर्षी या उपक्रमाचे कौतुक करत ‘किशोरदादांमुळे आम्हाला सुरक्षित वातावरणात दहीहंडीचा आनंद घेता येतो,’ अशा भावना व्यक्त करतात.
किशोर शिंदे म्हणाले, “महिला आज केवळ घर सांभाळणाऱ्या गृहिणी राहिलेल्या नाहीत. नोकरी, व्यवसाय, शिक्षण, क्रीडा, प्रशासन अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. आजची स्त्री अबला नाही, तर आपल्या सामर्थ्याने जगाला दिशा देणारी शक्ती आहे.” “भारताला सक्षम आणि महासत्ता बनवायचे असेल तर महिलांना योग्य सन्मान, समान संधी आणि ताकद मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे महिला सशक्तीकरण ही केवळ घोषणा न राहता ती प्रत्यक्ष कृतीत उतरवणे गरजेचे आहे,” असेही शिंदे यांनी सांगितले. दहीहंडी उत्सव म्हटले की पुरुषांची गोविंदा पथके आणि त्यांचा जल्लोष हेच चित्र आजवर पाहायला मिळत होते. हीच पारंपरिक चौकट मोडून महिलांनाही दहीहंडीचा उत्सव तितक्याच उत्साहाने आणि सुरक्षितपणे अनुभवता यावा, या उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ओम चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून कोथरूडमध्ये महाराष्ट्रातील सर्वप्रथम महिला दहीहंडी महोत्सवाच्या आयोजनाला सुरुवात करण्यात आली.
या महोत्सवात मैदानावर केवळ महिलांनाच प्रवेश दिला जातो. महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था केली जाते. त्यामुळे दरवर्षी सुमारे २५ हजार महिला या उत्सवात सहभागी होत आनंदोत्सव साजरा करतात, अशी माहिती किशोर शिंदे यांनी दिली.
या दहीहंडीचे संयोजन संजय काळे, गणेश शिंदे, श्रीकांत अमराळे, धनंजय बलकवडे आणि शशांक अमराळे, रवी वाल्हेकर, प्रतीक कंधारे, ओम शिंदे यांच्यासह असंख्य महाराष्ट्र सैनिकांनी केले. तसेच संगम तरुण मंडळ आणि सचिन फ्रेंड्स सर्कल-कुंदन ग्रुप यांच्या सहकाऱ्यांनी उत्सव यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.



