कर्वेनगरमध्ये वृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावले; विरोध करताना दुखापत, परिसरात घबराट

पोलिसांचा धाक राहिला नाही का?
पुणे : कर्वेनगर प्रभागातील गुलाबराव ताठे मंडळासमोरील परिसरात रात्रीच्या सुमारास वृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने जबरदस्तीने हिसकावून चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना घडली. रात्री सुमारे ८ वाजता घडलेल्या या प्रकारात महिलेने चोरट्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना दुखापत झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वृद्ध महिला रात्रीच्या सुमारास परिसरातून जात असताना चोरट्यांनी त्यांना लक्ष्य केले. अचानक त्यांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिलेने त्याला विरोध केला असता चोरट्यांनी जबरदस्तीने दागिने ओढून घेतले. या झटापटीत वृद्ध महिलेला दुखापत झाली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात येत आहे. चोरट्यांची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून विविध पातळ्यांवर तपास केला जात आहे.

महिनाभरात पुन्हा अशीच घटना
विशेष म्हणजे, सुमारे महिनाभरापूर्वी श्रीमान परिसरातही अशाच स्वरूपाची घटना घडली होती. त्यामुळे कर्वेनगर आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. वारंवार महिलांना लक्ष्य करून दागिने हिसकावण्याच्या घटना घडत असल्याने रात्रीच्या वेळी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गर्दीच्या किंवा रहदारीच्या ठिकाणीही अशा प्रकारे चोरटे महिलांना लक्ष्य करत असल्याने पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पोलिसांचा धाक राहिला नाही का?
कर्वेनगर परिसरात चोरी आणि दागिने हिसकावण्याच्या घटना पुन्हा घडत असल्याने गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक उरला आहे का?, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढविण्यासोबतच संवेदनशील भागांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त होत आहे.
दरम्यान, पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे. या घटनेतील आरोपी लवकरात लवकर जेरबंद करून परिसरातील नागरिकांना सुरक्षिततेची भावना निर्माण करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
नगरसेविका रेश्मा बराटे यांचे नागरिकांना आवाहन
या घटनेच्या पार्श्वभूमीवर माझी सर्व नागरिकांना लोकप्रतिनिधी म्हणून नम्र विनंती आहे की, दागिने हे मौल्यवान असले तरी आपल्या जीवापेक्षा अधिक मौल्यवान काहीही नाही. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी बाहेर जाताना शक्य तितक्या कमी प्रमाणात दागिन्यांचा वापर करावा व आपल्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य द्यावे. आपल्या परिसरातील सुरक्षिततेसाठी नागरिकांनी सतर्क राहणे, संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने संबंधित यंत्रणेला माहिती देणे गरजेचे आहे. सावधगिरी हीच सुरक्षिततेची पहिली पायरी आहे…
आपला जीव, आपली सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे..! असे आवाहन नगरसेविका रेश्मा बराटे यांनी नागरिकांना केले आहे.



