मोबाईल OTP द्वारे प्रमाणीकरणाचे आश्वासन हवेतच विरले? सोमवारी देखील परिवहन कार्यालयात ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन हस्तांतरण, नूतनीकरणाचे कामे अपूर्णच

अधिकारी म्हणतात MoRTH च्या मंजुरीनंतरच मोबाईल OTP द्वारे प्रमाणीकरण सुरू करणार
प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून निर्णयास टाळाटाळ;नागरिकांचा प्रचंड संताप
पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सोमवार पासून ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन हस्तांतरण, नूतनीकरणाच्या कामासाठी मोबाईल OTP द्वारे प्रमाणीकरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आज या कामास सुरवात करण्यात आली नाही.मोबाईल OTP द्वारे प्रमाणीकरण करण्याच्या कामाला MORTH कडे मंजुरी साठी पाठवण्यात आले असून त्यानंतरच जुनी पध्दत सुरू करण्यात येईल.अशी भूमिका परिवहन कार्यालयाने घेतली आहे. या प्रकारामुळे अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
सरकारच्या सारथी प्रणाली द्वारे आधारकार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स वरील नावात साम्य असल्यासच नूतनीकरण व नोंदणी करण्यास पुणे परिवहन कार्यालयाने सुरुवात केली असून यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणाचे आणि वाहन हस्तांतरण कामे रखडली असून याचा फटका नागरिकांना बसत आहे. नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत नागरिकांनी तक्रार केल्यानंतर सोमवार पासून जुनी पध्दत सुरू करण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र दोन दिवसांत यात बदल करीत मोबाईल OTP द्वारे प्रमाणीकरण करण्याच्या कामाला MORTH कडे मंजुरी साठी पाठवण्यात आले असून त्यानंतरच जुनी पध्दत सुरू करण्यात येईल.अशी भूमिका परिवहन कार्यालयाने घेतली आहे. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

आधार कार्ड आणि आर सी कार्ड वरील आधार नंबर वरून प्रमाणीकरण का नाही?
आधार कार्ड आणि वाहनांचे RC card वर नागरिकाचे नाव लिहण्याची पद्धत वेगळी आहे. RTO कडून नावानुसार प्रमाणीकरण करण्यात येत आहे. दोन्ही कागदपत्रांवर नावात साम्य आहे. मात्र लिहण्याची पद्धत वेगळी असल्याने कागदपत्र प्रमाणित होण्यास अडचण येत आहे. आरटीओ कार्यालयाने जर आधार कार्ड वरील आधार क्रमांक आणि RC कार्ड वरील आधार क्रमांक तपासला तर तो एकच येईल. आणि प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. मात्र अशा प्रकारे नागरिकांना का त्रास दिला जात आहे. असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत.
आधार कार्ड वरून सक्तीचे प्रमाणीकरण करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग का आग्रही आहे. जुन्या पद्धतीनुसार मोबाईल OTP द्वारे प्रमाणीकरण करण्यासाठी का टाळाटाळ करण्यात येत आहे. यामागे नक्की कोणाचा काय उद्देश आहे. हे समजत नाही. असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.तातडीने निर्णय घेऊन जुन्या पद्धतीनुसार मोबाईल OTP द्वारे प्रमाणीकरण करण्याचे काम सुरू करण्यात यावे. अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
MoRTH कडे मंजुरी मागितली आहे. ती मिळाल्यानंतरच मोबाईल OTP द्वारे प्रमाणीकरण-प्रादेशिक परिवहन सहाय्यक अधिकारी शैलेश कामत
याबाबतीत बोलताना प्रादेशिक परिवहन सहाय्यक अधिकारी शैलेश कामत म्हणाले, जुन्या पद्धतीनुसार मोबाईल OTP द्वारे प्रमाणीकरण करण्यासाठी NIC ने MoRTH कडे मंजुरी मागितली आहे. ती मिळाल्यानंतरच मोबाईल OTP द्वारे प्रमाणीकरण करता येईल. सध्या आधार प्रमाणीकरण द्वारे आरटीओ कार्यालयात जाऊन प्रमाणीकरण आणि हस्तांतरण, NOC आदी कामे करता येणार आहेत.
आधार प्रमाणीकरण सक्तीचे असल्याचा कोणताही आदेश किंवा जी आर दाखवा – विजय कुमार दुग्गल
याबाबतीत बोलताना महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल संघटनेचे अध्यक्ष विजय कुमार दुग्गल म्हणाले, केंद्र सरकारच्या वतीने आधार कार्ड सक्तीचे नसल्याचे सांगण्यात आले असताना देखील केवळ राज्यात परिवहन कार्यालय या विषयी सक्ती का करीत आहे? आधार प्रमाणीकरण सक्तीचे असल्याचा कोणताही आदेश किंवा जी आर असेल तर परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी आम्हास दाखवावा. या नव्या नियमांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तातडीने जुन्या पद्धतीनुसार मोबाईल OTP द्वारे प्रमाणीकरण करण्यास सुरुवात करण्यात यावी.
याबाबतीत प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेश नार्वेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
काय आहे नवा नियम?
वाहनाच्या मालकी हक्क हस्तांतरण (TO) व ना हरकत प्रमाणपत्र (NOC) या ऑनलाईन सेवांची एकसमान व प्रमाणित पद्धतीने अंमलबजावणी तसेच संबंधीत आधार प्रमाणीकरण करण्याचा निर्णय परिवहन कार्यालयाने घेतला आहे. सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय (MoRTH) यांचे दिनांक ०४.०५.२०२६ रोजीच्या पत्रानुसार देशातील सर्व राज्ये / केंद्रशासीत प्रदेशांमध्ये ऑनलाईन परिवहन सेवांची एकसमान व प्रमाणित पद्धतीने अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने Transfer of Ownership (TO) व No Objection Certificate (NOC) या सेवांसाठी सुधारित कार्यप्रवाह निश्चित करण्यात आला आहे. सदर सुधारित कार्यप्रवाहामध्ये संबंधीत अर्जदाराची Aadhaar Authentication/eKYC प्रक्रिया समाविष्ट करण्यात आलेली आहे. सदर कार्यप्रवाहास सक्षम प्राधिकाऱ्याची मान्यता प्राप्त असून त्यानुसार सदर सेवांची सुधारित पद्धतीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.



