पुणे शहर

आधारकार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स वरील नावात साम्य असल्यासच लायसन्सचे नूतनीकरण, वाहन मालकी हक्क हस्तांतरण आणि NOC 

संपूर्ण महाराष्ट्रात परिवहन कार्यालयात ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन हस्तांतरण, नूतनीकरणाचे कामे रखडल्याने नागरिकांचा संताप 

सोमवार पासून जुन्या पद्धतीनुसारच मोबाईल OTP द्वारे प्रमाणीकरण होणार – राज्य परिवहन कार्यालय  सहाय्यक आयुक्त शैलेश कामत यांची माहिती

पुणे : सरकारच्या सारथी प्रणाली द्वारे आधारकार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स वरील नावात साम्य असल्यासच नूतनीकरण व नोंदणी करण्यास संपूर्ण महाराष्ट्रात परिवहन कार्यालयाने सुरुवात केली असून यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणाचे आणि वाहन हस्तांतरण कामे रखडली असून याचा फटका नागरिकांना बसत आहे. नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

वाहनाच्या मालकी हक्क हस्तांतरण (TO) व ना हरकत प्रमाणपत्र (NOC) या ऑनलाईन सेवांची एकसमान व प्रमाणित पद्धतीने अंमलबजावणी तसेच संबंधीत आधार प्रमाणीकरण करण्याचा निर्णय परिवहन कार्यालयाने घेतला आहे. सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय (MoRTH) यांचे दिनांक ०४.०५.२०२६ रोजीच्या पत्रानुसार देशातील सर्व राज्ये / केंद्रशासीत प्रदेशांमध्ये ऑनलाईन परिवहन सेवांची एकसमान व प्रमाणित पद्धतीने अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने Transfer of Ownership (TO) व No Objection Certificate (NOC) या सेवांसाठी सुधारित कार्यप्रवाह निश्चित करण्यात आला आहे. सदर सुधारित कार्यप्रवाहामध्ये संबंधीत अर्जदाराची Aadhaar Authentication/eKYC प्रक्रिया समाविष्ट करण्यात आलेली आहे. सदर कार्यप्रवाहास सक्षम प्राधिकाऱ्याची मान्यता प्राप्त असून त्यानुसार सदर सेवांची सुधारित पद्धतीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Img 20260222 wa00064513382578852640289

वास्तविक पाहता केंद्र सरकारच्या वतीने 16 सप्टेंबर 2022 रोजी अधिसूचना काढीत परिवहन च्या सुविधेसाठी आधार कार्ड सक्तीचे नसून ऐच्छिक असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र तरी देखील पुणे परिवहन कार्यालयाकडून आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले असून वाहन नोंदणी आणि वाहन हस्तांतरण, नूतनीकरण करण्यासाठी आधार कार्ड वरील नावात आणि ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठी, वाहन हस्तांतरण साठी लागणाऱ्या कागदपत्रांवरील नावात साम्य असले पाहिजे. ते नसेल तर महा इ सेवा केंद्रात जाऊन आधार कार्ड वरील नाव आणि नोंदणी नूतनीकरण कागद पत्रावरील नावात दुरुस्ती करून दोन्ही नावात साम्य करा. असे सांगण्यात येत आहे. 

या प्रकारामुळे नागरिकांना परिवहन कार्यालय, महा इ सेवा केंद्र याठिकाणी हेलपाटे मारावे लागत असल्याने नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. सरकारच्या वतीने नागरिकांच्या सुविधेसाठी ऑनलाइन पद्धतीने काम पुर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र या नव्या नियमांमुळे ही कामे ऑनलाईन होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. 

याबाबतीत बोलताना महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल संघटनेचे अध्यक्ष विजय कुमार दुग्गल म्हणाले, केंद्र सरकार च्या वतीने आधार कार्ड सक्तीचे नसल्याचे सांगण्यात आले असताना देखील पुणे परिवहन कार्यालय निष्कारण सक्ती करीत आहे. आधार कार्ड सक्तीचे नसून ऐच्छिक असल्याने परिवहन कार्यालयाने लाईट बिल, टॅक्स पावती, रेशन कार्ड, इंडेक्स नंबर , पासपोर्ट या व इतर कागद पत्रांच्या आधारे नोंदणी, नूतनीकरणाचे कामे पूर्ण केली पाहिजे. नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. 

राज्य परिवहन सह आयुक्त शैलेश कामत म्हणाले, आम्ही याबाबत जुन्या पद्धतीनुसार मोबाईल OTP द्वारे प्रमाणीकरण करणार आहोत. गेल्या दीड महिन्या पासून नवीन पद्धतीनुसार प्रमाणीकरण करण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्यामध्ये नागरिकांना अडचणी येत आहेत. रहिवाशी पत्त्या बाबत नागरिक आधार शिवाय इतर कागद पत्र सादर करू शकतात. मात्र प्रमाणीकरण मोबाईल OTP द्वारे जुन्या पद्धतीनुसार केले जाईल. सोमवार पासून जुन्या पद्धतीनुसारच मोबाईल OTP द्वारे प्रमाणीकरण होणार आहे.

पुणे प्रादेशिक परिवहन आयुक्त अर्चना गायकवाड म्हणाल्या, आधार प्रमाणीकरणा बाबत नवीन पद्धतीनुसार नागरिकांना सुविधा मिळण्यात अडचण येत आहे. त्यामुळे जुन्या पद्धतीनुसार मोबाईल OTP द्वारे आधार कार्ड चे प्रमाणीकरण करण्यात येणार असून येत्या दोन दिवसांत सोमवारपासून मोबाईल द्वारे OTP पद्धत पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. जेणेकरून नागरिकांची अडचण होणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये