पुणे शहर

दुसऱ्याच्या दुःखात मदतीसाठी प्रत्येकाच्या घरात एखादी पिगी बँक असावी : मंत्री चंद्रकांत पाटील

मानसी प्रेरणा फाऊंडेशनचा रक्षाबंधन स्नेहबंध सोहळा उत्साहात

दुसऱ्याच्या दुःखात मदतीसाठी प्रत्येकाच्या घरात एखादी पिगी बँक असावी. त्यामुळे अडचणीच्या काळात गरजू व्यक्तींना सढळ हस्ते मदत करणे सहज शक्य होईल, अशी भावना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री  चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

चंद्रकांत पाटील यांच्या सामाजिक कार्याने आपण प्रभावित झालो असल्याची भावना क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी लिमिटेडचे कार्यकारी संचालक कृष्णकुमार बूब यांनी व्यक्त केली.

चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून कोथरूडमध्ये कार्यरत असलेल्या मानसी प्रेरणा फाऊंडेशनच्या वतीने रक्षाबंधन स्नेहबंध सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी लिमिटेडचे कार्यकारी संचालक कृष्णकुमार बूब, सहमहाव्यवस्थापक निलेश विद्वांस, मानसी प्रेरणा फाऊंडेशनच्या संचालिका मुग्धा भागवत, माजी नगरसेविका छाया मारणे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते.

Img 20260222 wa00064513382578852640289

पाटील म्हणाले, “सामाजिक काम करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, अनेकदा आर्थिक अडचणींमुळे इच्छा असूनही ते शक्य होत नाही. त्यामुळे मंदिरातील दानपेटीप्रमाणे घरातील देवघरात एखादी पिगी बँक ठेवावी आणि रोज त्यामध्ये आपल्या क्षमतेनुसार पैसे जमा करावेत. असे केल्यास अडचणीत असलेल्या गरजू व्यक्तींना मदत करणे शक्य होईल.”

या कार्यक्रमावेळी मानसी प्रेरणा फाऊंडेशनच्या मुलींनी सादर केलेली योग प्रात्यक्षिके पाहून क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी लिमिटेडचे कार्यकारी संचालक कृष्णकुमार बूब आणि सहमहाव्यवस्थापक निलेश विद्वांस प्रभावित झाले.

आपल्या भावना व्यक्त करताना कृष्णकुमार बूब म्हणाले, “सामाजिक कार्यात आम्ही नेहमीच सढळ हस्ते मदत करत असतो. महिलांशी संबंधित कामांबाबत मला नेहमीच आपुलकी वाटते. राजकीय व्यक्तींपासून काहीसे अंतर राखूनच आम्ही आमचे काम करत असतो. मात्र, चंद्रकांतदादा पाटील यांचे सामाजिक कार्य आणि मानसी प्रेरणा फाऊंडेशनची व्याप्ती पाहून मी प्रभावित झालो. भविष्यातही या सामाजिक कार्यात शक्य तितक्या प्रमाणात मदत करू,” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी सानिका कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या भजनसंध्येचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तबलावादक आशय कुलकर्णी यांच्या अप्रतिम वादनाने  उपस्थित सर्वच मान्यवर भारावून गेले.

आशय कुलकर्णी यांच्या तबलावादनाला  पाटील यांनी मनापासून दाद दिली. त्यांच्या उत्कृष्ट वादनाचे कौतुक करत चंद्रकांत पाटील यांनी आपले मनगटी घड्याळ भेट देत आशय कुलकर्णी यांचे अभिनंदन केले.

Img 20260827 wa02272215426650213501056

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये