पुणे शहर

कोथरूडमधील सुतारदरामध्ये शेकडो कोटींचा जमीन गैरव्यवहार?१९६५ चा वादग्रस्त दस्त आणि १०६ पाने गायब….

वादग्रस्त जमिनीचा प्रतीकात्मक ताबा कोर्ट रिसीव्हरकडे, सर्वोच्च न्यायालयाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा दिला आदेश

पुणे : कोथरूडमधील सुतारदरा परिसरात पोलीस बंदोबस्तात टेकडीचे खोदकाम आणि सपाटीकरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. आता २६ नोव्हेंबर २०२६ रोजी संबंधित जागेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोर्ट रिसिव्हरने प्रतीकात्मक ताबा घेतल्याचा फलक समोर आला आहे. या फलकावर कोथरूडमधील सुतारदरा येथील सर्व्हे क्रमांक ११३/१ आणि ११३/२ मधील एकूण ३७ एकर ३८ गुंठे जमिनीचा उल्लेख आहे. तर या शेकडो कोटींचे बाजारमूल्य असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या जमीन व्यवहारासंदर्भात युवक काँग्रेस नेते अक्षय जैन यांनी गंभीर आक्षेप उपस्थित केल्याने त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा दिला आहे आदेश

कोथरूड सुतारदरा येथील जमीन प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती कायम ठेवण्याचा आदेश दिला असून  प्रकरण आता दि. १८.१२.२०२६ रोजी सुनावणीसाठी सूचीबद्ध केले आहे.

कोथरूडमधील कोट्यवधी रुपयांच्या भूखंड वादाला आता नाट्यमय वळण मिळाले आहे. शहरातील मोक्याची ३६ एकर ३७ गुंठे मोक्याची जमीन विकसकाच्या ताब्यात देण्याच्या पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या वादग्रस्त जमिनीचा प्रतीकात्मक ताबा कोर्ट रिसीव्हरने (न्यायालयाने नियुक्त केलेल्या मालमत्ता व्यवस्थापकाला) घ्यावा आणि यापुढे कोणतेही अतिक्रमण होणार नाही याची खात्री करावी, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या आदेशामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

जमिनीचा १९६५ चा वादग्रस्त दस्त, नोंदणी विभागाच्या कागदपत्रांतील गायब असलेली १०६ पाने आणि प्रशासकीय अनियमिततेच्या आरोपांवरून गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयामार्फत (ईडी) चौकशी करावी, तसेच मूळ दस्तऐवजाची फॉरेन्सिक तपासणी करावी, अशी मागणी
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने केली आहे.


या प्रकरणी डेक्कन जिमखाना येथील ‘मध्यमवर्गीय सर्वोदय सहकारी गृह रचना संस्था मर्यादित यांच्या वतीने शांता यादव आणि सरोज भोसले नाईक यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महसूल व नोंदणी विभागाचे अधिकारी, तसेच पुणे शहर पोलीस आयुक्त, कोथरूड पोलीस, गोल्ड फ्यूजन रिअल्टीचे समीर मुलाणी आणि हिलएज् रिअल्टी अँड डेव्हलपर्सचे दर्शन चोरडिया यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

पुण्यातील पत्रकार भवन येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत जैन यांनी या जमीन प्रकरणातील प्रशासकीय अनियमितता, संशयास्पद व्यवहार आणि दुर्लक्षित करण्यात आलेल्या गंभीर आक्षेपांचा मुद्दा उपस्थित केला. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित न्यायालयीन आदेशाची प्रत आणि संबंधित जागेवर लावण्यात आलेला कोर्ट रिसिव्हरच्या प्रतीकात्मक ताब्याचा फलक समोर आल्याने या जमीन प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.

कोथरूडमधील सुतारदरा परिसरातील सर्व्हे क्रमांक ११३ मधील बीडीपी आणि हिलटॉप क्षेत्रात ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस बंदोबस्तात मोठ्या प्रमाणावर टेकडीचे खोदकाम आणि सपाटीकरण करण्यात आले होते. यानंतर हे प्रकरण चर्चेत आले आहे.

Screenshot 2026 1119 1009536682663007404979299

अक्षय जैन म्हणाले, कोथरूडमधील सर्व्हे नं. ११३ चा कथित जमीन घोटाळा दिवसेंदिवस संशयाच्या भोवऱ्यात अडकत चालला आहे. उच्च न्यायालयाच्या कोर्ट रिसीव्हरच्या ताब्यात असलेली जमीन आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती असतानाही हा व्यवहार कोणाच्या आशीर्वादाने झाला?

प्रशासनाची संशयास्पद दिरंगाई आणि नोंदणी विभागाची भूमिका पाहता या संपूर्ण प्रकरणाची CBI आणि ED मार्फत तात्काळ सखोल चौकशी व्हावी!दोषी कितीही वजनदार असले तरी त्यांच्यावर कठोर गुन्हे दाखल व्हावेत.प्रश्न शेकडो कोटींच्या जमिनीचा नाही, तर पुणेकरांच्या हक्काचा आणि पारदर्शकतेचा आहे. जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आम्ही कधीही खपवून घेणार नाही. असा इशारा जैन यांनी दिला आहे.

1967 पासून 2019 पर्यंत न्यायालयीन प्रकरण सुरू असतानाही त्रुटी पूर्ण दस्तांच्या आधारे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने केलेल्या कार्यवाही वर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी हिलएज रियल्टी ॲन्ड डेव्हलपर्स एलएलपी या कंपनीला जमिनीचा ताबा देण्याचे आदेश रद्द करून संबंधित जमीन न्यायालयाच्या प्रतिकात्मक ताब्यात देण्याचे निर्देश दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणातील प्रशासकीय अनियमितता, संशयास्पद आदेश आणि आर्थिक व्यवहारांची सीबीआय व ईडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी जैन यांनी केली आहे.

पुण्याच्या नैसर्गिक संपत्तीचा भाग असलेल्या टेकडीवर अशा प्रकारे यंत्रसामग्री चालविली जात असताना महापालिका प्रशासन नेमके काय करीत होते? या कामासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का? पोलीस बंदोबस्त कोणाच्या मागणीवरून आणि कोणाच्या आदेशाने देण्यात आला होता? असे अनेक प्रश्न त्यावेळी उपस्थित करण्यात आले होते. आता या जमीन प्रकरणात गंभीर आरोप झाले आहेत.

१९६५ चा वादग्रस्त दस्त आणि गायब १०६ पाने

या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी जमिनीचा दस्त क्रमांक १४१४/१९६५ आहे. हा दस्त कथितरीत्या १९६५ मध्ये झाल्याचे सांगितले जात असले, तरी तो तब्बल ५५ वर्षांनंतर, डिसेंबर २०१९ मध्ये समोर आल्याचे समजते. तत्कालीन सह जिल्हा निबंधक (वर्ग १) गोपीनाथ कोळेकर यांनी २०२१ मध्ये केलेल्या तपासणीत नोंदणी अभिलेखांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या होत्या. संबंधित अंगठा नोंदणी पुस्तकातील १०६ पाने गायब असल्याची

बाब समोर आली होती. तसेच इंडेक्स १ आणि २ ची कागदपत्रे, पावती पुस्तके, डे बुक्स आणि व्हॉल्यूम रजिस्टर क्रमांक ३३ उपलब्ध नसल्याचेही स्पष्ट झाले होते.

नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रकांनी नेमलेल्या पाच सदस्यीय समितीनेही मूळ अभिलेखांमध्ये त्रुटी असल्याचे नमूद केले. स्टॅम्प पेपरच्या तपशीलातील विसंगती, पक्षकार व साक्षीदारांची अपूर्ण पडताळणी आणि नोंदणी अधिनियम, १९०८ च्या तरतुदींच्या पालनातील कमतरता याबाबी त्यात समाविष्ट आहेत. या त्रुटी असूनही मालकी आणि ताबा वादात हे दस्तऐवज केंद्रस्थानी राहिले आहे.

यापुढे संबंधित जागेवर कोणतीही खोदाई करण्यात येऊ नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा या पत्राद्वारे देण्यात आला होता.उपलब्ध न्यायालयीन आदेशाच्या प्रतीनुसार, मध्यमवर्गीय सर्वोदय सहकारी गृहरचना संस्था मर्यादित यांनी महाराष्ट्र शासन व इतरांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका क्रमांक ६०९०/२०२६ दाखल केली आहे.

५ नोव्हेंबर २०२६ रोजी न्यायमूर्ती ए. एस. गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली होती.याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ राजीव चव्हाण, प्रतिवादी क्रमांक आठ यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ आबाद पोंडा, तर प्रतिवादी क्रमांक दहा यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. या सुनावणीवेळी कोथरूड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हर्षल कदम हेही उपस्थित होते.

कपिल सिब्बल यांनी अधिक सूचना घेण्यासाठी आणि सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी मुदत मागितली होती. त्यानुसार न्यायालयाने सुनावणी २० नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलत याचिकेतील प्रार्थना कलम ‘डी’नुसार पुढील तारखेपर्यंत अंतरिम दिलासा दिला होता.

जागेवर कोर्ट रिसिव्हरने प्रतीकात्मक ताबा

२६ नोव्हेंबर २०२६ रोजी संबंधित जागेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोर्ट रिसिव्हरने प्रतीकात्मक ताबा घेतल्याचा फलक समोर आला आहे. या फलकावर कोथरूडमधील सुतारदरा येथील सर्व्हे क्रमांक ११३/१ आणि ११३/२ मधील एकूण ३७ एकर ३८ गुंठे जमिनीचा उल्लेख आहे.

याच ठिकाणी ‘हिलएज रिअॅलिटी अँड डेव्हलपर्स एलएलपी’च्या खासगी मालमत्तेचाही फलक दिसत आहे.या जमिनीच्या प्रतीकात्मक ताब्यासंदर्भातील मूळ न्यायालयीन आदेश समोर आल्यानंतर त्याबाबतची अधिक स्पष्ट माहिती उपलब्ध होऊ शकेल.

गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाबाबत कोथरूड मधील नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहे. या प्रकरणात काय जमीन घोटाळा झाला आहे? या पाठी मागे कोण कोणत्या नेत्यांचा आशीर्वाद आहे? यावर नागरिक चर्चा करीत आहेत. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाल्यानंतरच यामागील सत्य समोर येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये