समाविष्ट २३ गावातील पाणी टंचाईबाबत राष्ट्रवादीचे महापालिकेत आंदोलन…

प्राथमिक सुविधा पुरविण्यातही भाजप ठरलं अपयशी : प्रशांत जगताप
पुणे : पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांना प्राथमिक सुविधा पुरविण्यातही सत्ताधारी भाजप अपयशी ठरलं आहे. सत्ताधारी भाजपाने माणसांच्या आयुष्यातला सर्वात अविभाज्य भाग असलेला पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. गावकरी तात्पुरती सोय म्हणून टँकरचा वापर करत होते परंतु ही सोय देखील सत्ताधारकानी बंद करून टाकली. त्यामुळे सत्ताधारी भाजपमुळे या गावातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे.
समाविष्ट गावातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असून हा पाणी प्रश्न तातडीने सोडवण्यात यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुणे महापालकेच्या प्रवेशद्वारात आंदोलन करण्यात आले. यावेळी जगताप यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली.
जगताप म्हणाले, स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवणारी भाजपा नागरिकांच्या प्राथमिक सुविधाही पुरवू शकत नाही हे सिद्ध झाले आहे. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत पुणेकर नागरिक याची नक्की दखल घेतील.
दिपाली धुमाळ म्हणाल्या की, समाविष्ट गावातील प्रश्न सोडवण्याकडे महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. या भागातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असतानाही सत्ताधाऱ्यांकडून बघ्याची भूमिका घेतली जात असल्याने आज त्याचा निषेध करण्यात आला.
या आंदोलनामध्ये महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, नगरसेवक सचिन दोडके, बाबुराव चांदेरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष किशोर कांबळे, काका चव्हाण, कोथरुड मतदार संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, महेश हांडे, तसेच सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहिले होते. यावेळी नव्याने समाविष्ट गावांतील अनेक नागरिकांनीही या आंदोलनात सहभाग घेऊन सत्ताधारी भाजपच्या निष्क्रिय राजवटीचा निषेध केला.




