बावधन, भुसारीमध्ये अनधिकृत खाद्य टेम्पोंमागे सुरू आहे लाखोंची वसुली..भ्रष्ट रॅकेट उघड ; नगरसेवक किरण दगडे पाटील रस्त्यावर उतरताच वास्तव आले समोर

बावधन : प्रभाग क्रमांक १० मधील भुसारी कॉलनी परिसरात अनधिकृत खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या टेम्पोंमागे मोठे भ्रष्ट रॅकेट चालत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आज नगरसेवक किरण दगडे पाटील स्वतः घटनास्थळी उतरून कारवाई करताच भयानक वास्तव समोर आले आहे. या प्रकारात काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने लाखो रुपयांची वसुली होत असल्याचा आरोप दगडे पाटील यांनी केला आहे.
बावधन, भुसारी कॉलनी, चांदणी चौक परिसरात अंडाभुर्जी, चिकन, पाणीपुरी, मोमोज, कुल्फी आदी खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या टेम्पो चालकांकडून ठराविक ‘रेटकार्ड’ ठरवून दर महिन्याला काही जणांकडून मोठ्या प्रमाणात पैसे वसूल केले जात असल्याचा आरोप किरण दगडे पाटील यांनी केला आहे. या रॅकेटमध्ये काही शासकीय अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

यावेळी बोलताना नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “माझा भाजी विक्रेत्यांना कधीच विरोध नव्हता आणि नसेलही. मात्र या खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या भ्रष्ट टेम्पो रॅकेटला आता बिलकुल सहन केले जाणार नाही.” पालिकेची कारवाईची माहिती मिळताच काही व्हॉट्सअॅप ग्रुपवर “आज कारवाई होणार, सावध राहा” असे संदेश पाठवले जातात. हे मेसेज पाठवणारे कोण आहेत ? पालिका अधिकारी यात सहभागी असल्याशिवाय असे मेसेज पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे कुंपणच शेत खात असल्याचे चित्र आहे.
लहान हातगाड्या व गरीब भाजी विक्रेत्यांवर कारवाई होत असताना मोठ्या टेम्पोंना संरक्षण मिळत असल्याचा संताप स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रात्री उशिरापर्यंत हे टेम्पो सुरू राहत असून त्यामुळे परिसरात गर्दी वाढते, दारू पिणाऱ्यांचे टोळके जमा होतात आणि त्यामुळे गुन्हेगारीचा धोका वाढत आहे. याबाबत अनेकदा तक्रारी व निवेदने देऊनही प्रशासनाने ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप केला जात आहे.
दरम्यान, नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी प्रशासनाला इशारा देत अनधिकृत टेम्पो तात्काळ हटवून संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, माझी आजची कारवाई ही केवळ सुरुवात असून प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास पुढील पाऊल अधिक आक्रमक व मोठ्या स्वरूपाचे असेल, असा इशाराही त्यांनी दिला.



