पुणे शहर

महात्मा फुलेंना द्विशताब्दी जयंती वर्षातच ‘भारतरत्न’ मिळावा : खा. ज्योती वाघमारे

पुणे : “क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांनी समाजासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ मरणोत्तर प्रदान करण्यात यावा, यासाठी केंद्र सरकारकडे विशेष आग्रह धरला जाईल,” अशी ग्वाही खासदार ज्योती वाघमारे यांनी आज येथे दिली.

Img 20260222 wa00064690128680200836049

महात्मा ज्योतिराव फुले द्विशताब्दी जयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित अभिवादन सभेत त्या बोलत होत्या. या प्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार वाघमारे यांनी गायलेल्या गीताने जिंकली मने
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे खासदार ज्योती वाघमारे यांनी स्वतः महात्मा फुले यांच्या कार्यावर आधारित एक प्रेरणादायी गीत सादर केले. त्यांच्या सुश्राव्य आवाजातील या गीताने उपस्थित सर्वांची मने जिंकली आणि सभागृहात चैतन्य निर्माण झाले. लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी सांभाळतानाच कलेच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केलेल्या आदरांजलीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पुण्यात साजरी होणार देशातील सर्वात मोठी जयंती
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली. ते म्हणाले की, “पुणे ही महात्मा फुलेंची कर्मभूमी आहे. त्यामुळे पुढील वर्षी महात्मा फुले यांची देशातील सर्वात मोठी आणि भव्य जयंती पुणे शहरात साजरी केली जाईल. महापालिकेच्या माध्यमातून यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.”

द्विशताब्दी महोत्सव समितीचे मुख्य निमंत्रक राहुल डंबाळे यांनी समितीच्या आगामी रूपरेषेबद्दल माहिती दिली. “महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी समितीच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाला सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते विश्वास गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते अंजूम इनामदार, शिवसेनेचे मिलिंद आहिरे, विठ्ठल गायकवाड, अशोक दिलपाक, राहुल नागटिळक यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी महात्मा फुले यांच्या कार्याचे स्मरण करत त्यांच्या विचारांचा जागर करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये